अतिरेकी ‘नियोजनात’ पर्वणी हुकली
कुंभमेळ्याकडे भाविकांची पाठ : कोट्यवधीचे स्वप्न हवेत विरले
नाशिक : पाच-पाच किलोमीटर भाविकांना करावी लागणारी पायपीट, प्रमुख रस्ते व गल्लीबोळांचे बल्ली बॅरिकेडिंगने आवळलेले गळे, सुरक्षा व्यवस्थेच्या नावाखाली केला गेलेला अतिरेक आणि जणू पोलीस रस्त्यावर अवतरले नाहीत, तर अराजकता माजल्याशिवाय राहणारच नाही, असा ठायीठायी आत्मविश्वास बाळगून असलेल्या पोलीस प्रशासन यंत्रणेच्या अतिरेकामुळे सिंहस्थातील पहिल्याच पर्वणीचे अवास्तव नियोजन बारगळले व कोट्यवधी भाविक येणार असल्याच्या केवळ वल्गना करून नागरिकांना वेठीस धरणाऱ्या पोलीस यंत्रणेच्या निषेधार्थ भाविकांनी शाही पर्वणीकडेच पाठ फिरविली. नाशिक व त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी पहाटे उजाडल्यापासून भाविकांची संख्या रोडावलेली दिसत असतानाही मुजोर पोलीस यंत्रणेने आपला हेका दिवसभर कायम ठेवल्याचे पाहून अखेर पालकमंत्री गिरीश महाजन यांनाच नियोजन चुकल्याची जाहीर कबुली द्यावी लागली, तर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ‘कुंभमेळा नव्हे तर कर्फ्यूमेळा’ अशा शब्दात तीव्र नाराजी व्यक्त केली. आता सिंहस्थाची पहिली पर्वणी राजकीय पातळीवरही गाजू लागल्याचे पाहून पोलीस प्रशासनाने रक्षाबंधनाचे निमित्त पुढे करत, सणामुळे भाविकच घराबाहेर पडले नसल्याची सारवासारव करण्यास सुरुवात केली आहे.कुंभमेळा तयारीच्या पहिल्या दिवसापासूनच शाही पर्वणीच्या दिवशी ८० लाख ते एक कोटी भाविक येण्याची शक्यता व्यक्त करून गर्दीचे नियोजन, सुरक्षेच्या उपाययोजना, वाहतूक व्यवस्था व पोलीस बंदोबस्त अशा गोष्टींनाच अधिक प्राधान्य देत पोलीस प्रशासनाने तयारी तर केलीच; परंतु प्रत्यक्ष पर्वणीच्या दिवशी कायदा-सुव्यवस्था, तसेच संभाव्य अतिरेकी कारवायांची घटना घडू शकते त्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीचा बाऊ करून शहराचा बल्ली बॅरिकेडिंगने पिंजरा केला. नाशिककरांनी पर्वणीच्या दिवशी बाहेर पडूच नये, शिवाय आपल्याकडे येऊ पाहणाऱ्या बाहेरगावच्या आप्तांनाही नाशिकच्या सीमेवर रोखून ठेवण्याचे आवाहन करून पोलीस थांबले नाहीत, तर शहरापासून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरच वाहने रोखून ठेवण्याचा तर त्याहून निम्मे अंतर पायपीट केल्याशिवाय पर्वणीचे पुण्य पदरात पडू देणार नाही, असा पणही केला.परिणामी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पहिल्यांदाच होऊ पाहणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशच नव्हे तर जगभरातून भाविक येण्यासाठी प्रचार व प्रसार होण्याऐवजी कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत नकारात्मक संदेशच सर्वदूर पसरल्याने भाविकांनी ‘नको तो कुंभमेळा’ म्हणत दोन हात दूर राहणेच पसंत केले. पोलीस प्रशासन यंत्रणेच्या ‘अतिरेका’चा निषेध करीत भाविकांची कुंभमेळ्यात सहभागी न होण्याची कृती अगदी पर्वणीच्या पूर्वसंध्येला स्पष्ट दिसत असतानाही रामकुंड परिसरात भाविकांना मज्जाव करणे, त्र्यंबकेश्वरला येऊ पाहणाऱ्यांना दहा किलोमीटर पायपीट करायला भाग पाडणे, शहरातील गल्ली-बोळाच्या तोंडाशी रहिवाशांपेक्षाही अतिरिक्त संख्येने सशस्त्र पोलिसांची नेमणूक करणे, त्र्यंबकेश्वरला कुशावर्त परिसरात नागरिकांना घराबाहेर उभे राहण्यास मज्जाव करणे हे असले चाळे सुरूच ठेवल्यामुळे मध्यरात्रीच पालकमंत्री गिरीश महाजन यांना नागरिकांनी घेराव घालून जाब विचारल्याची घटना ताजी असतानाही पोलिसांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही, परिणामी बाहेरगावाहून येण्याचे भाविकांनी टाळलेच पण नाशिककरांनीही थेट घरात नळावाटे येणाऱ्या गोदेच्या पाण्यात शाहीस्रानाचा आनंद लुटला. कोट्यवधी भाविक येतील म्हणून केलेली उपाययोजना कुचकामी ठरली व त्यावर सांडलेले द्रव्यही वाया गेले. बालहट्ट धरून ज्या घाटांची निर्मिती केली गेली, त्या घाटांना न मिळालेल्या प्रतिसादावरून तेथून भाविक परत बोलविण्याची नामुष्की आली तर जे रस्ते करकचून आवळण्यात आले, ते भाविकांसाठी पुन्हा खुले करून मनधरणीचा प्रयत्न करण्यात आला. परंतु ‘बुंद से गई वो हौद से..’ म्हणत कोट्यवधी भाविकांचा नकार म्हणजे मुजोर यंत्रणेला बसलेली चपराकच ठरली आहे.
प्रशासनाचा अंदाज चुकलारक्षाबंधनाचा सण असल्याने पर्वणीला गर्दी झाली नाही. देशात कोठेही कुंभमेळा असला, तरी पहिल्या पर्वणीला भाविकांची संख्या तशीही कमीच असते. या पर्वणीसाठीचा प्रशासनाचा भाविकांच्या संख्येचा अंदाज चुकला. पोलिसांकडून काही गोष्टी चुकीच्या घडल्या असतील, तर त्या पुढच्या वेळी सुधारल्या जातील. काही धोक्याच्या सूचना असल्याने पोलिसांना कडक बंदोबस्त ठेवावा लागला; मात्र पुढच्या पर्वणीचा सर्वांना आनंद घेता येईल, अशी व्यवस्था केली जाईल. पुढच्या दोन्ही पर्वण्यांना लाखो भाविक येतील, अशी अपेक्षा आहे. शहरात बॅरिकेडिंगचा अतिरेक करू नये, याबाबत पोलिसांना सूचना केल्या जातील.- गिरीश महाजन, पालकमंत्री
कुंभमेळा नव्हे, कुंभ ‘कफ्यरू’कुंभमेळा हा नाशिककरांचा उत्सव आहे. यावेळी मात्र हा कुंभमेळा नव्हे कुंभ ‘कफ्र्यू’ आहे, असे खेदाने म्हणावे लागेल. प्रशासनाने कुंभमेळ्याचे नियोजन व्यवस्थित केले खरे; मात्र कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली लोकांवर अतिरेकी निर्बंध लादण्यात आले. त्यामुळे परगावचे सोडा, स्थानिक नागरिकही रामकुंडापर्यंत पोहोचू शकले नाहीत. नुसते सगळे नाशिककर जरी घराबाहेर पडले असते, तरी वीस लाखांची गर्दी जमली असती; मात्र पोलिसांनी निर्माण केलेल्या भीतीमुळे हे होऊ शकले नाही. प्रशासनाला एवढे निर्बंधच लादायचे होते, तर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कुंभमेळा घेऊ नये, असे सांगून टाकायला हवे होते.- छगन भुजबळ, माजी पालकमंत्री