येवला : शहरातील नगरपालिका रस्त्यावरील जुन्या कोर्ट मैदानात श्री साई सेवा भक्त परिवाराच्या वतीने आयोजित महापारायण सोहळ्याचा शनिवारी समारोप झाला. यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत साईबाबांचा सजीव देखावा, भगवे फेटे व नऊवारी साड्या नेसलेल्या महिला व गंगापूरच्या शिवराणा ग्रुपच्या ढोल पथकाने येवलेकरांचे लक्ष वेधले. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सालाबादप्रमाणे यंदाही श्री साई सेवा भक्त परिवाराच्या वतीने आयोजित साईचरित पारायण सोहळा लक्षवेधी ठरला. पारायण सोहळ्याचे यंदाचे सातवे वर्ष होते. सोहळ्यात एकूण ३७१ साईभक्तांनी सहभाग घेऊन पारायण केले. यात ३१० महिला व ६१ पुरु षांचा समावेश होता. नऊ दिवस झालेल्या पारायणात अनिल महाराज जमधडे यांनी निरुपण केले. शनिवारी पारायण सोहळचा समारोप झाला. समारोपनिमित्त सकाळी ११ वाजता पालिका रस्त्यावरील जुन्या कोर्ट मैदानावरून साई पालखीची मिरवणूक काढण्यात आली. गंगापूरच्या शिवराणा ग्रुपचे ढोल पथक मिरवणुकीचे आकर्षण ठरले. साईबाबांच्या सजीव देखाव्यात बाबांची वेशभूषा प्रमोद आवणकर, तात्या पाटलांची वेशभूषा अक्षय राजगुरु , तर अब्दुल बाबांची वेशभूषा वैभव साबळे यांनी केली. श्री साई सेवा भक्त परिवाराचे संस्थापक बिरजू राजपूत यांनी सहभागी साई भक्तांचे स्वागत केले. अध्यक्ष श्रीकांत खंदारे यांनी शिवराणा ग्रुपच्या ढोल पथकातील युवकांनी व साई भक्त महिलांनी भगवे फेटे बांधले होते. पालखी मिरवणूक शहरातील आझाद चौक, राणा प्रताप चौक, काळा मारुती रोड, पटणीगल्ली, जब्रेश्वर खुंट, मेन रोड, खांबेकर खुंट, थिएटर रोड या मार्गांवरुन नेण्यात आली. ठिकठिकाणी नागरिकांनी साई पालखीवर पुष्पवृष्टी केली. सुवर्र्णा जमधडे यांचे काल्याचे कीर्तन झाले. यानंतर साईभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. पारायण सोहळा यशस्वीतेसाठी बिरजू राजपूत, श्रीकांत खंदारे, संतोष गुंजाळ, निरंजन रासकर, दिगंबर गुंजाळ, अनिल माळी, मनोज मडके, भुऱ्या रासकर, ज्ञानेश्वर जगताप, बंटी भावसार, सुनील हिरे, राम रासकर, शंकर परदेशी, पप्पू गुंजाळ, श्रीकांत हिरे, भूषण हिरे आदिंसह श्री साई सेवा भक्तपरिवाराने परिश्रम घेतले. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.४) सायंकाळी ५ वाजता येवला-शिर्डी पदयात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थापक बिरजू राजपुत यांनी दिली. (वार्ताहर)
साईभक्तांची मांदियाळी
By admin | Updated: April 2, 2017 00:24 IST