नाशिक : वाळूमाफियांनी प्रांत अधिकारी, तहसीलदार व मंडल अधिकाऱ्यांवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी जिल्ह्यातील प्रांत अधिकारी, तहसीलदारांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन वाळूचोरांविरुद्ध कारवाई करू पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना पोलीस संरक्षण द्यावे, असे साकडे घातले. दोन दिवसांपूर्वी येवला येथे दोन घटनांमध्ये महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने त्याविरुद्ध एकत्र येत अधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले. त्यात मुजोर अनधिकृत रेती वाहतूकदारांवर एम.पी.डी.ए. मोक्का, तडीपारी यांसारखी कारवाई अपेक्षित असून, येवल्याच्या घटनेत किशोर परदेशी व बंटी परदेशी यांचाच हात आहे. त्यामुळे अवैध रेती पकडणाऱ्या तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी बाळासाहेब वाकचौरे, शशिकांत मंगरुळे, सुनील सैंदाणे, मनोजकुमार खैरनार, शरद मंडलिक, मंदार कुलकर्णी, कैलास कडलग, महेश चौधरी, वंदना खरमाळे-मांडगे, अर्चना खेतमाळीस, संजय श्ािंदे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांना पोलीस संरक्षण द्या
By admin | Updated: March 20, 2015 00:08 IST