नाशिक : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्यात येऊन, नुकसानग्रस्तांना तत्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पेरणीसाठी मोफत बियाणे व खते पुरविण्यात यावीत आदि मागण्यांचे निवेदन सोमवारी (दि.८) राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना देण्यात आले.निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, वादळ यामुळे शेतकऱ्यांची ३/४ पिके वाया गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीस सापडला आहे. यंदा नाशिक जिल्ह्यात काही तालुक्यांत अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणात शेतीसह मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी दिरंगाई न करता सरसकट पंचनामे करून सरकारने शेतकऱ्यांना मदत देऊन दिलासा देणे गरजेचे आहे. पिके, पेरण्या वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना नावाने पतपुरवठा करणे आवश्यक आहे. याकरिता अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून सरकारने तातडीने शासकीय मदत उपलब्ध करून द्यावी. तसेच आवश्यक ती शासकीय मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसने केली आहे. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, माजी खासदार देवीदास पिंगळे, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे, दिलीप थेटे, नितीन मोहिते, अर्जुन टिळे, विष्णुपंत म्हैसधुणे, प्रेरणा बलकवडे, पंचायत समिती सभापती मंदाबाई निकम, महेश भामरे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पूरग्रस्तांना भरपाई तत्काळ द्या
By admin | Updated: August 8, 2016 23:40 IST