नाशिक : एकीकडे महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीविषयी गळे काढणाऱ्या महापालिका आयुक्तांकडून कोट्यवधी रुपयांचे अनावश्यक प्रस्ताव आणले जात असल्याने त्याविरोधात विरोधक एकवटले असून, सोमवारी (दि. ६) होणाऱ्या महासभेत आयुक्तांसह सत्ताधारी मनसेला जाब विचारला जाणार आहे. प्रामुख्याने घरपट्टी-पाणीपट्टीसह घंटागाडीचा दीर्घ मुदतीचा ठेका, उद्यानांचे खासगीकरण या विषयांवर प्रशासनाला घेरण्याची व्यूहरचना विरोधकांनी केल्याने महासभा वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. महापालिकेची विशेष महासभा सोमवारी होत आहे. महासभेत पाटबंधारे विभागाकडून वाढीव पाणीपुरवठ्यासाठी रखडलेला करारनामा, सर्व उद्यानांचे खासगीकरण, घंटागाडीचा ठेका दहा वर्षे मुदतीसाठी देणे, नवीन भूसंपादन कायद्यानुसार भूसंपादनासाठी सुमारे साडेचार हजार कोटी रुपयांची तरतूद करणे, घरपट्टी व पाणीपट्टीत वाढ करणे, मुकणे धरणासाठी महापालिकेच्या निधीतून तरतूद करणे आदि प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहेत. महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना कोट्यवधी रुपयांचे अनावश्यक प्रस्ताव महासभा व स्थायी समितीवर आणले जात असल्याने विरोधी पक्षांनी त्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. कॉँग्रेसचे गटनेते उत्तमराव कांबळे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन महासभेत कॉँग्रेसची असणारी भूमिका स्पष्ट केली आहे, तर विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक यांनीही उद्यानाच्या खासगीकरणासह घंटागाडी ठेक्याविषयी प्रशासनाला जाब विचारण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांनीही घरपट्टी व पाणीपट्टी दरवाढीच्या प्रस्तावाला विरोध दर्शवित अगोदर पाणीपुरवठ्यातील गळती थांबविण्याची सूचना केली आहे. त्याचबरोबर घंटागाडीच्या दीर्घमुदतीच्या ठेक्यालाही विरोध दर्शविला आहे. मुकणे धरणातून थेट पाइपलाइन योजनेबाबत मनपाच्या निधीतून तरतूद करणे अपरिहार्य ठरणार असल्याने या मुद्यावरही विरोधकांकडून प्रशासनाला घेरले जाण्याची शक्यता आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली केवळ दिशादर्शक फलकांसाठी होणाऱ्या १४ कोटी रुपये खर्चाच्या मुद्यावर वादळी चर्चा होण्याची चिन्हे आहेत. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांसह आयुक्तांनाही घेरण्याची व्यूहरचना केल्याने महापौरांची कसोटी लागणार आहे. (प्रतिनिधी)
महासभा वादळी ठरण्याची चिन्हे
By admin | Updated: April 6, 2015 01:12 IST