नाशिक : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला’, ‘अर्धा लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला’ असे म्हणत सात दिवसांच्या बाप्पासह तीन दिवसांच्या माहेरवाशीण गौरींनाही हळव्या मनाने निरोप देण्यात आला. शहरातील गोदाघाटासह सोमेश्वर, नवश्या गणपती मंदिर, आनंदवली, आसारामबापू पूल आदि ठिकाणी गणेश मूर्तींचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यात आले.दुपारी दीड वाजेपासून ‘बाप्पा’ विसर्जनासाठी घाटावर येत होते. काही विसर्जन घाटावर विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या मदतीसाठी नागरी संरक्षण दलाचे जवान उपस्थित होते. विसर्जन घाटावर भाविकांनी गणेश मूर्तीसह गौरींचे मुखवटेही आणले होते. यावेळी मातीच्या मुखवट्यांचे विसर्जन तर पितळी मुखवट्यांना नदीच्या पाण्याने स्रान घालण्यात आले. महिलांनी पाणावलेल्या डोळ्यांनी गौरींना निरोप देण्यासाठी विसर्जन घाटावर गर्दी केली होती. विसर्जन घाटांवर ‘घरात सुख, समाधान नांदू दे’ अशी प्रार्थना करत महालक्ष्मीची आरती करण्यात येऊन गौरीच्या मुखवट्यांचे विसर्जन करण्यात आले. (प्रतिनिधी)
गौरींबरोबरच बाप्पाला भावपूर्ण निरोप
By admin | Updated: September 11, 2016 02:17 IST