दिंडोरी : तालुक्यातील गौळीपाडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेसमोर असलेले गुलमोहराचे मोठे झाड सकाळी ६ वाजता शाळेच्या दोन वर्गखोल्यांवर पडल्यामुळे सुमारे ४० सीमेंट पत्रे तुटले असून, व्हरांडा पूर्णपणे नेस्तनाबूत झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना विद्यार्थी शाळेत येण्यापूर्वीच घडल्यामुळे मोठा अनर्थ टळला असल्याची माहिती उपसरपंच वसंतराव भोये यांनी दिली.याबाबत अधिक माहिती देताना भोये यांनी सांगितले की, ही शाळा इमारत ३५ वर्षांपूर्वीची असून, इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. अशा धोकादायक इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. यदाकदाचित एखादी दुर्दैवी घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले की, याबाबत गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांना ग्रामस्थांनी लेखी तक्रार देऊनही याबाबत कुठलीच दखल अधिकाऱ्यांनी घेतली नाही. उलट शाळेला पाच लाख रुपये मंजूर झाल्याची खोटी माहिती देऊन ग्रामस्थांची दिशाभूल केल्याचा आरोप भोये यांनी केला. याबाबत केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. (वार्ताहर)
गौळीपाडा शाळेवर कोसळले झाड
By admin | Updated: August 18, 2016 00:07 IST