नाशिक : धनत्रयोदशीच्या संध्येला घंटागाडी कामगारांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठाण मांडत सुधारित किमान वेतनासाठी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. ‘घंटागाडी कामगार उपाशीपोटी, आयुक्ताला पाहिजे स्मार्ट सिटी’ अशा घोषणा देत कामगारांनी ऐन दिवाळीत आंदोलन आणखी उग्र करण्याचा इशारा दिला. घंटागाडी कामगारांना कामगार उपआयुक्तांच्या आदेशानुसार २४ फेबु्रवारी २०१५ पासून सुधारित किमान वेतन लागू करत फरकासह रक्कम अदा करण्याचे आदेश महापालिकेला देऊनही प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याच्या निषेधार्थ कामगारांनी सोमवारी महापालिका प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांनी कामगार उपआयुक्तांच्या पत्रानुसार घंटागाडी कामगारांना सुधारित किमान वेतन अदा करण्याचे आदेश आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांना दिले, परंतु आरोग्याधिकाऱ्यांनी आॅक्टोबरसह नोव्हेंबरचेही बिल ठेकेदारांना अदा केल्याचे निदर्शनास आल्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनी ठेकेदारांच्या अनामत रकमेतून सदर किमान वेतन देण्याचे आदेशित केले. तरीही प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याच्या निषेधार्थ घंटागाडी कामगारांनी ठिय्या आंदोलन केले.
घंटागाडी कामगार उपाशीपोटी, आयुक्ताला पाहिजे स्मार्ट सिटी
By admin | Updated: November 9, 2015 23:38 IST