नाशिक : रविवारच्या सुटीचा मुहूर्त साधत नाशिकमधील बाजारपेठेमध्ये ग्राहकांची खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. सजावट साहित्याने गजबजलेल्या कानडे मारुती लेन नागरिकांच्या गर्दीने भरगच्च झाली होती. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने खरेदीचा देखील उत्साह असल्याने वीकेण्डला बाजारपेठ गजबज आहे. बाजारात होणाऱ्या गर्दीमुळे मात्र कोरोना नियमांकडे दुर्लक्ष होण्याची गंभीर बाबदेखील घडत असल्याने पालकमंत्र्यांकडून अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गणेशोत्सव तोंडावर आल्याने बाजारात सजावटीचे साहित्य तसेच गणेशमूर्तींचे स्टॉल्स लागले आहेत. कोरोनानंतर निर्बंध शिथिल झाल्यामुळे यंदा बाजारात सजावट साहित्यही मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून ग्राहकांना आकर्षित करीत आहे. गणेशमूर्तीवर यंदा निर्बंध असल्यामुळे चार फुटांपेक्षा जास्त उंचीची मूर्ती घडविण्यात आलेली नाही. त्यामुळे बाजारात सर्वत्र एकसारख्या मूर्ती दिसत आहेत. प्लॅस्टिकच्या फुलांच्या माळा, थर्माकोलचे मखर, नानाविध रंगाचे आकर्षक लायटिंग आणि मखमली कापडांनी संपूर्ण बाजारपेठ सजली आहे.
गणेशोत्सवाच्या अगोदरचा रविवार असल्यामुळे ग्राहक खरेदी करण्यासाठी बाहेर पडले. दिवसभर बाजारपेठेत खरेदीसाठीची झुंबड उडाल्याने कानडे मारुती लेन, मेन रोड, रविवार कारंजा, नाशिक रोड येथील देवी चौक, सिडकोतील शिवाजीनगर, पवननगर या भागातील बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने गजबजल्या आहेत. दरम्यान, नासर्डी पुलाजवळील गणेशमूर्ती विक्री स्टॉल्सवर मोठ्या प्रमाणात मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. रस्त्याच्या दुतर्फा स्टॉल्स लागलेले आहेत.
खरेदीचा उत्साह एकीकडे असला तरी कोरोना नियमांचे पालन होत नसल्याचेही दिसून आले. शहरात गेल्या काही दिवसांपासून कोराेना रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसत असल्याने प्रत्येकाने खबरदारी घेणे अपेक्षित आहे. गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले जात असल्याने नागरिकांनी शक्यतो गर्दीत जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहेे. दोनच दिवसांपूर्वी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन करताना गर्दीमुळे कोराेनात वाढ झाली तर नाइलाजाने निर्बंध लागू शकतील, असा इशारा दिलेला आहे.