इंदिरानगर : नाशिक शहरासह विविध उपनगरांमध्ये गणेशोत्सवाचे देखावे बघण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी होत आहे. परिसरातही भव्य आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे देखावे उभारण्यात आले आहेत.श्रींच्या आगमनापासून दररोज येणाऱ्या पावसाने गणेश मंडळे आणि भक्तांचा हिरमोड होत आहे. परिसरातील मंडळांकडून हजारो रुपये खर्च करून आकर्षक देखावे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आनंद मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा प्रथमच परिसरात इंदिरानगर युवक मित्रमंडळाने भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे कार्यक्रम ठेवले आहेत. यामध्ये भजनी मंडळाची स्पर्धा, सामुदायिक अथर्वशीर्ष पठण, शालेय गटातील सूर्यनमस्कर, वकृत्व स्पर्धा, समूहगान स्पर्धा, मंगळागौरी, पाककृती स्पर्धा आदिंचे आयोजन केले आहे.युनिक ग्रुप राजीवनगर दरवर्षी लकी ड्रॉ द्वारे गरजूंना मदतीचा हात देते. आत्महत्त्या केलेल्या बारकू खैरनार व अनिल खैर या दोघा शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये देण्यात येणार आहेत. (वार्ताहर)