नाशिकरोड : अंबड पोलिसांनी दोन वर्षांकरिता तडीपार केलेला व अट्टल घरफोडी करणारा अनिल काळे हा नाशिकरोड पोलिसांना जेलरोड श्रमिकनगर झोपडपट्टीत मिळून आला.अंबड पोलिसांनी संशयित अनिल कोंडाजी काळे उर्फ कोंड्या या अट्टल घरफोड्यास दोन वर्षाकरिता शहर-जिल्हा परिसरातून दोन वर्षांकरिता हद्दपारीची कारवाई केली होती. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात १५ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. नाशिकरोड पोलीस मारामारीच्या गुन्ह्यातील संशयितांच्या तपासासाठी शुक्रवारी दुपारी जेलरोड श्रमिकनगर झोपडपट्टीत गेले होते. यावेळी त्यांना अंबड पोलिसांनी दोन वर्षांकरिता तडीपार केलेला अनिल काळे हा सासरी राहत असल्याची माहिती मिळाली. यावेळी पोलीस आल्याचे बघून अनिल पळून जाऊ लागताच उपनिरीक्षक भीमराव गायकवाड, हवालदार उत्तम दळवी, कय्युम सय्यद, संतोष घुगे, मिलिंद पवार यांनी त्याचा पाठलाग करून शिताफीने पकडले. (प्रतिनिधी)
तडीपार गुंडास अटक
By admin | Updated: July 23, 2016 01:24 IST