त्र्यंबकेश्वर : आदिवासी महिलेस मारहाण केल्याप्रकरणी श्रमजीवी संघटनेच्या वतीने त्र्यंबक पोलीस ठाण्यावर मंगळवारी (दि.१७) त्र्यंबक पोलीस व महसूल कर्मचारी यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला.या मोर्चाचे नेतृत्व श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित, जनरल सेक्रेटरी बाळाराम भगत, सहचिटणीस विजय जाधव, कार्याध्यक्ष केशव नानकर, जिल्हा सरचिटणीस भगवान मधे आदिंनी केले. धुमोडी येथे श्री पंचायती उदासीन (बडा) निर्वाण आखाड्याची शेतजमीन असून, जमिनीसंदर्भात न्यायालयात दावा दाखल आहे. ही जमीन एक शेतकरी कुटुंब कसत आहे. मूळ मालकाला जागा परत करावी, असा हायकोर्टाने निकाल दिला असून, जागा परत ताब्यात घेण्यासाठी त्र्यंबक पोलीस स्टेशनचे तीन ते चार कर्मचारी व महसूल विभागाचे दोन कर्मचारी गेले होते. सोबत आखाड्यांचा ट्रॅक्टरदेखील होता. यावेळी कुटुंबातील महिलेने जागा न्यायप्रविष्ट असल्याने ताबा सोडण्यास विरोध केला. यावेळी पोलिसांत व महिलेत बाचाबाची झाली. पोलिसांनी महिलेला धक्का बुक्की केली. पोलिसांनी महिलेला मारहाण केली त्यात ती जखमी झाली, असा श्रमजीवी संघटना व महिलेने आरोप केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, यासाठी महिला ठाण्यात गेली असता, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात विरोध केला. माझी तक्रार दाखल करून घ्यावी व संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. संबंधितांवर गुन्हा दाखल करावा व कारवाई करावी व महिलेला न्याय द्यावा यासाठी हे प्रकरण श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांनी उचलून धरले. संघटनेने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला व मागणीचे निवेदन सादर केले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.(वार्ताहर)
श्रमजीवी संघटनेचा मोर्चा
By admin | Updated: November 17, 2015 23:01 IST