नाशिक : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभाग व सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने जिल्'ातील अपंगांची मोफत तपासणी करून त्यांच्यासाठी आवश्यक असलेले कृत्रिम साहित्य व यंत्रांचे विनामूल्य वाटप करण्यात येणार आहे. येत्या २४ तारखेला त्र्यंबकेश्वरला या मोफत अपंग सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी दिली. जिल्'ातील सर्व अपंगांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्यासाठी सर्व गटविकास अधिकारी, खातेप्रमुख यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील अपंग कर्मचाऱ्यांची यादी बनविण्यास सांगण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर येथे बडा उदासीन आखाडा येथे २४ एप्रिलला केंद्र सरकारच्या अपंग जन सशक्तीकरण विभाग, सामाजिक न्याय विभाग, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (कानपूर), पंडित दीनदयाल उपाध्यय अपंग जनकल्याण संस्थान (नवी दिल्ली) व बडा उदासीन आखाडा (त्र्यंबकेश्वर) यांच्या संयुक्त विद्यमाने या मोफत अपंग सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी अपंग असल्याचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, पिवळे रेशन कार्ड, अपंग दर्शविणारे ६ पासपोर्ट फोटो आदि प्रमाणपत्र सादर करावयाचे असून, अपंगांना ज्या साहित्याची व यंत्राची गरज असेल ते यंत्र तत्काळ मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. जिल्'ात जवळपास ११ हजार अपंग विद्यार्थी, तसेच शासकीय वसतिगृहातील साडेपाचशे विद्यार्थी आणि पंचायत समिती अंतर्गत असलेले सुमारे आठ हजारांच्या आसपास अपंगांची संख्या आहे. उत्पन्नाचा दाखला हा सरपंचांच्या पत्रावर किंवा महापौर, आमदार खासदारांच्या शिफारशीनुसारही चालू शकणार असल्याचे बनकर यांनी सांगितले. त्यामुळे या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त अपंग बांधवांनी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)
अपंगांना मिळणार मोफत कृत्रिम अंग,
By admin | Updated: April 14, 2015 01:03 IST