नाशिक : रिक्षाचालकास प्रवासी असल्याचे सांगून आडमार्गाला नेऊन मारहाण केल्यानंतर सदर रिक्षा पळवून नेत शहरातील विविध ठिकाणी दरोडा, जबरी लूट, तसेच मारहाण करणाऱ्या चौघा संशयितांना इंदिरानगर पोलिसांनी बुधवारी (दि़१५) रात्री अटक केली़ या संशयितांमध्ये नेपाळचे दोघे, तर जळगाव व नाशिकमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे़ दरम्यान, या चौघांनी ५ फेब्रुवारीला रात्री दहा ते साडेदहा या अवघ्या अर्धा तासात तिघांना जबर मारहाण तसेच धारदार शस्त्राने वार करून लुटल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे़इंदिरानगर पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांमध्ये कुंदन सोमनाथ खैरनार ऊर्फ कुंद्या (१९, रामवाडी), समाधान शांताराम ऊर्फ सीताराम पाटील (२८, रा़ अष्टगंध सोसायटी, जुईनगर, पेठरोड, मूळ रा़ भातखेड, ता़ एरंडोल, जि़ जळगाव), रमेश मानबहादूर थापा (१९, पंचवटी, मूळ रा़ नेपाळ) व टिकाराम बहादूर डांगी (१९, रा़ विडी कामगारनगर, क. का.वाघ कॉलेजच्या पाठीमागे, आडगाव़, मूळ रा़ नेपाळ) या चौघांचा समावेश आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ५ फेब्रुवारी २०१७ रोजी रात्रीच्या सुमारास अमोल परदेशी (रा़ शिंगवे बहुला, देवळाली कॅम्प) या रिक्षा (एमएच १५, झेड ९२०६) चालकास या चौघा संशयितांनी जयशंकर लॉन्स येथे जायचे आहे, असे सांगितले़ तिथे पोहोचल्यानंतर त्यास प्रवासभाडे न देता बेदम मारहाण करून त्याच्याजवळील ५१० रुपये व रिक्षा पळवून नेली़ यानंतर ही रिक्षा घेऊन संशयित वडाळा गावातील मदार लॉन्स परिसरात गेले़ या ठिकाणी नाजिर अन्सारी या युवकास जबर मारहाण व पाठीवर कुकरीने वार करून जबर जखमी केल्यानंतर दोन हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकावून पळ काढला़या चौघा संशयितांनी यानंतर रिक्षा इंदिरानगरच्या मेट्रो झोन गेटसमोरील अंधारात लावून रस्त्याने जात असलेले संकेत निमसे यांना कोयत्याचा धाक दाखवून अडविले़ त्यांच्याकडील मोबाइल व खिशातील पाकिट काढत असताना अचानक निमसे यांचा भाऊ तिथे आल्याचे पाहून निमसे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून रिक्षातून पळून गेले़ याप्रकरणी भद्रकाली व इंदिरानगर पोलीस ठाण्यात दरोड्याचे गुन्हे दाखल करण्यात आले होते़ दरम्यान, या संशयितांनी शहरात अनेक ठिकाणी दरोडा व लूट केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़
दरोड्यातील चौघे संशयित गजाआड; नेपाळच्या दोघांचा समावेश
By admin | Updated: February 16, 2017 17:16 IST