नांदगाव : तालुका सीमेवरील वाकला शिवारात स्मशानभूमी जवळील कोल्हापूर बंधाऱ्याजवळ बिबट्याशी झालेल्या झुंजीत दोन शेतकरी व दोन वनविभागाचे कर्मचारी यांना गंभीर जखमी केले. या घटनेने वाकला,जातेगाव, गोंडेगाव बोढरे या परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे.
नांदगाव चांदेश्वरी, परधाडी जंगलात वास्तव्याला असलेला बिबट्या रविवारी दुपारच्या सुमारास डिगू सोनवणे यांच्या वाकला शिवारातील डाळिंब बागेत दिसला. शेतकरी बाळू शेजवळ हे बिबट्याला हाकलण्यासाठी गेले. तेव्हा बिबट्याने शेजवळ यांच्यावर प्रति हल्ला केला. दोघांमध्ये चांगलीच झुंज झाली. शेजवळ यांनी बिबट्याचे दोन्ही जबडे दोन्ही हातांनी ताणून धरले तरी देखील बिबट्याने शेजवळ यांना शंभर फूट फरपटत ओढून नेले. चित्रपटात शोभेल असा हा थरार होता. दरम्यान शेजारी सुयश जाधव मोठ्या हिमतीने हातात काठी घेऊन बिबट्यावर चालून गेले. तेव्हा बिबट्याच्या मार्गात बंधाऱ्याची भिंत आडवी आल्याने त्याला पुढे जाण्यासाठी चाल मिळाली नाही. म्हणून त्याने थांबून जाधव यांच्यावर पंजा मारून त्यांना जखमी केले आणि तिथून पळ काढला. सुयश जाधव यांचे प्रसंगावधान व धैर्य यामुळे बाळू शेजवळ यांचे प्राण वाचले. दोघांच्या झुंजीची वार्ता गावात वाऱ्याच्या वेगाने पसरली. शेकडो गावकरी घटनास्थळी धावले. दोघा जखमींना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले आहे.
यानंतर दुपारपासून शेकडो लोकांनी दूर अंतरावरून रिंगण करुन बिबट्या तेथेच थांबविला. तो झुडपात लपून बसला होता.
-----------------------
ड्रोनच्या मदतीने बिबट्याचा शोध
कन्नड वनविभागाचे कर्मचारी पिंजरा घेऊन दाखल झाले. त्यांनी ड्रोनच्या मदतीने बिबट्याचा शोध घेतला व त्याठिकाणी जाळे टाकून पकडत असतांना बिबट्याने वनविभागाचे शेख आणि आमले या दोन कर्मचाऱ्यांवर हल्ला करुन तो जाळ्यातून निसटला. नांदगाव तालुक्यातील चांदेश्वरी, परधाडी जंगलातून ढेकू गावाकडे आलेला बिबट्या जवळच्या जंगलात पसार झाल्याची माहिती वाकला सरपंच गोरख बोढरे यांनी वनविभाग व पोलिसांना संपर्क करुन दिली. या भागातील नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
--------------------------
बिबट्याशी झुंज देताना जखमी झालेले बाळू शेजवळ. (२२ नांदगाव २)
===Photopath===
220621\22nsk_3_22062021_13.jpg
===Caption===
२२ नांदगाव २