नाशिक : शालेय क्रीडांगणासाठी प्राप्त झालेले अनुदान क्रीडांगण तयार न करताच परस्पर लाटल्या प्रकरणी अंबोडे ग्रामपंचायतीच्या मुख्याध्यापक व ग्रामविकास अधिकाऱ्यांसह तत्कालीन उपअभियंता, तसेच चार मुख्याध्यापक व एक शिक्षक असे एकूण सात कर्मचारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे २१ फेब्रुवारी रोजीच दै. लोकमतने ‘स्वत:च्या कुटुंबातच घेतला आर्थिक लाभ, अंबोडे ग्रामपंचायतीत गैरव्यवहार’ अशा आशयाचे वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. माजी सभापती मंदाकिनी भोये यांनी याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी व उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. अंबोडे गु्रप ग्रामपंचायती अंतर्गत अंबोडे, सरमाळ, झगडपाडा, खडकी दिघर व आंबेपाडा या पाच ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शालेय क्रीडांगण तयार करण्यासाठी ८ लाख ९८ हजारांचे अनुदान प्राप्त झाले होते. या अनुदानातून प्रत्यक्षात क्रीडांगण न करता परस्पर हे अनुदान काढून घेण्यात आल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अंबोडेचे मुख्याध्यापक जितेंद्र निकम, झगडपाड्याचे मुख्याध्यापक गंगाराम चंदर पाडवी, खडकी दिघर मुख्याध्यापक भालचंद्र रामचंद्र कासवटे, सरमाळ मुख्याध्यापक सदाशिव आनंदा चौधरी, तसेच अंबोडेचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी गिरीधर सीताराम भरसट व शिक्षक रमेश विश्वास पाटील यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्या काळातील तत्कालीन इवद दोन विभागाचे उपअभियंता एस. डी. शिवदे यांनाही निलंबित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे माहितीच्या अधिकारात खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याप्रकरणी नामदेव साठे, नितीन बोंबले, तुषार कोकणी या तीन शिक्षकांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेशही प्रशासनाने शिक्षण विभागाला दिले आहेत.(प्रतिनिधी)
उपअभियंत्यासह चार मुख्याध्यापक, ग्रामसेवक, शिक्षक निलंबित
By admin | Updated: March 8, 2015 01:27 IST