सिडको : सिडकोच्या मध्यभागी सुमारे १७ एकर जागेत गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या पेलिकन पार्कचा प्रश्न मार्गी लावावा व याठिकाणी सिडकोवासीयांच्या उपयोगी पडेल, असा प्रकल्प उभारण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती आमदार सीमा हिरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.सिडकोतील बंद अवस्थेत असलेले पेलिकन पार्क सध्या कचरा डेपो बनला असून, हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी याआधीही सर्वच राजकीय पक्षांनी प्रयत्न केले आहेत. माजी आमदार नितीन भोसले यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते, तर विजय रणाते यांनी नागपंचमीच्या दिवशी या उद्यानात अनोखे आंदोलन उभारून यास सर्प उद्यान असे उपरोधकनाव दिले होते. हा प्रश्न सिडकोवासीयांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याने आमदार हिरे यांनीदेखील हा प्रश्न प्रतिष्ठेचा केला असून, हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.यात असलेल्या सर्व अटी-शर्ती तसेच न्यायालयीन बाब या सर्व बाबींचा तपासून व अभ्यास करून पार्कचा प्रश्न साठविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सीमा हिरे यांनी सांगितले. सध्या सर्वत्र पाणीप्रश्न अत्यंत बिकट झालेला असून, मतदारसंघातील नागरिकांचा पाणीप्रश्न कायमचा मार्गी लागावा यासाठी आग्रही असून, यासाठी मुकणे धरणातून पाणीपुरवठा सुरू झाल्यास याचा फायदा मतदारसंघातील नागरिकांना होणार असल्याचेही आमदार हिरे यांनी सांगितले. (वार्ताहर)
‘पेलिकन पार्क’प्रश्नी आमदारांचा पाठपुरावा
By admin | Updated: April 11, 2016 00:07 IST