नाशिक : विस्तारणाऱ्या नाशिकच्या सार्वजनिक वाहतुकीच्या इतिहासात गुरुवारी (दि. ८) नवा अध्याय जोडला गेला. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देेवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते बी.डी. भालेकर मैदानाजवळ हिरवा बावटा दाखवून नाशिक महानगर परिवहन महामंडळ कंपनीच्या सिटीलिंक या बससेवेचे उद्घाटन झाले आणि नाशिककरांची नवी लाइफलाइन ठरू शकेल, अशी बससेवा दिमाखात सुरू झाली.
नाशिक शहर प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या पन्नास प्रदूषणविरहित इलेक्ट्रिकल बससाठी केंद्र शासनाकडून अनुदानाची मान्यता घेण्यात येईल, असे सांगून फडणवीस यांनी यावेळी आश्वस्त केले, तर शहर बससेवा तोट्यात जाऊ नये ही सर्वांचीच जबाबदारी असल्याचे सांगून पालकमंत्री छगन भुजबळ यांनी तोट्यातील बससेवा सावरण्याची सूचना केली.
कोरोनामुळे तब्बल दीड वर्षे लांबणीवर पडलेला शहर बससेवेचा प्रकल्प अखेरीस गुरुवारी मार्गी लागला. महाकवी कालिदास कलामंदिरात झालेल्या या सोहळ्यात फडणवीस तसेच भुजबळ उपस्थित होते, तर मुंबई येथून राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे दूरदृश्य प्रणालीद्वारे काही काळ सहभागी झाले होते. महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात माजी पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री जयकुमार रावल, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे व ॲड.राहुल ढिकले. उपमहापौर भिकूबाई बागुल, स्थायी समिती सभापती गणेश गिते, माजी आमदार बाळासाहेब सानप, मनपातील सभागृह नेते कमलेश बोडके, विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते, विलास शिंदे, लक्ष्मण सावजी, विजय साने, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
कोणतेही शहर उत्तम असले पाहिजे त्यासाठी हवा-पाण्याबराेबरच पर्यावरण राखले गेले पाहिजे. त्याष्टीने नाशिकमध्ये सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी महापालिकेची बससेवा उपयुक्त ठरेल, असा विश्वास यावेळी विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. काेणतीही सार्वजनिक वाहतूक सेवा डिपॅण्डीबिलिटी आणि प्रीडिक्टेबल असेल तरच यशस्वी होते. महापालिकेला याबाबत काळजी घ्यावी लागेल.
नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करताना ती तोट्यात जाणार नाही याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे असे सांगितले. राज्य परिवहन महामंडळाची सेवा ताेट्यात असली तरी शासन त्यातील तोट्याची जबाबदारी घेत आहे. महापालिकेची बससेवा तोट्यात आल्यास त्याचा संपूर्ण भार हा नागरिकांच्या माथीच असणार आहे त्या दृष्टीने आपण नव्याने मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर बससेवेचा तोटा सोसण्यास महापालिका सक्षम आहे काय, असा प्रश्न केला हाेता, असेही भुजबळ म्हणाले.
यावेळी भुजबळ आणि फडणवीस यांच्या हस्ते बससेवेची काेनशिला, ॲपचे दूरनियंत्रकाने उद्घाटन करण्यात आले तर सिटीलिंक या लाेगोचे अनावरण करतानाच तो तयार करणाऱ्या सिद्धेश चव्हाणके या युवकाचा सत्कारही करण्यात आला.
आयुक्त कैलास जाधव यांनी प्रास्ताविकात नाशिकच्या अत्याधुनिक बससेवेचा आढावा घेतला, तर महापौर सतीश कुलकर्णी यांनी राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली. स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी आभार मानले.
इन्फो...
नाशिकची निओ मेट्रो ठरणार ग्लोबल मॉडेल
नाशिकसारख्या महानगरांपेक्षा तुलनात्मक दृष्ट्या छोट्या असलेल्या शहरांत मेट्रोला पर्याय म्हणून निओ मेट्रो सुरू करण्यात येणार आहे. महामेट्रोचे दीक्षित यांनी ही किफायतशीर सेवा सुरू करण्याची संकल्पना मांडली. ती आता पंतप्रधानांच्या वाराणसी मतदारसंघासह सहा शहरात प्रयोगिक तत्त्वावर राबवण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिकची निओ मेट्रो देशभरात मॉडेल ठरणार आहे, इतकेच नव्हे तर ग्लोबल मॉडेल ठरेल असे फडणवीस यांनी सांगितले. मुंबईत बस, रेल्वे, मोनो रेल अशा सर्वांसाठी एकच तिकीट चालते तसेच नाशिक महापालिकेची बससेवा आणि मेट्रोसाठी एकच तिकीट चालेल अशी सिटीलिंकमध्ये व्यवस्था करण्याची सूचनाही त्यांनी केली.
इन्फो...
नाशिकमध्ये धूर ओकणारे कारखाने नको!
नाशिकच्या विकासासाठी औद्योगिकरण चांगले असले तरी नाशिकचे हवामान चांगलेच राहिले पाहिजे यासाठी धूर ओकणारे कारखाने नकोच अशी भूमिका मांडली. नाशिकच्या विकासाठी नवीन शिक्षण संस्थांच्या माध्यमातून एज्युकेशन हब तयार करता येईल, पर्यटनदेखील विकसित करता येईल, औद्येागिकीकरणासाठी आयटी उद्योगदेखील आले पाहिजे; परंतु हवामान चांगले राहावे यासाठी प्रदूषणकारी उद्योग नकोत, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.