नाशिक : लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा शुक्रवारी अंतिम दिवस असून, कोण कोण माघार घेतो याकडे राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीतून डोईजड ठरू पाहणाऱ्यांनी माघार घ्यावी यासाठी अखेरचा प्रयत्न म्हणून गुरुवारी दिवसभर एकमेकांना अंदाज घेण्याचे काम उमेदवारांकडून केले जात होते.जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी मतदारसंघासाठी २ एप्रिलपासून नामांकन दाखल करण्यास सुरुवात झाली होती. सुरुवातीच्या दोन दिवसांत एकही अर्ज दाखल झाला नसला तरी, अखेरच्या दोन दिवसांत प्रमुख राजकीय पक्षांबरोबरच अपक्षांनी नामांकन दाखल करण्यास गर्दी केली. त्यामुळे नाशिकमधून अखेरच्या दिवसांपर्यंत ३० जणांनी, तर दिंडोरीतून १५ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. बुधवारी झालेल्या छाननीत दिंडोरीतून सहा व नाशिकमधून सात अर्ज बाद ठरविण्यात आल्याने निवडणुकीच्या रिंगणात नाशिक मतदारसंघात २३ व दिंडोरीतून नऊ उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले आहेत.
नाशिकमध्ये दोन मतदान यंत्रांची शक्यता
दिंडोरीत उमेदवारांची संख्या कमी असल्याने एका मतदान यंत्रावर मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. परंतु नाशिकमध्ये उमेदवारांची संख्या पाहता दोन यंत्रे प्रत्येक मतदान केंद्रावर ठेवण्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे शुक्रवारी माघारीच्या दिवशी किती उमेदवार माघार घेतात याकडे प्रशासनाचेही लक्ष लागून आहे. शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत माघारीची वेळ असून, त्यानंतर रिंगणातील उमेदवारांना मतदान चिन्हांचे वाटप केले जाईल. प्रमुख राजकीय पक्षांचे चिन्हे राखीव असल्याने त्यांना अधिकृत चिन्हे दिले जातील, मात्र अपक्ष उमेदवारांना चिन्हवाटप करावे लागणार आहे. गुरुवारी दिवसभर या संदर्भात हालचाली सुरू होत्या.