शनिवारी सकाळी म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांना पेठरोडवरील एका एटीएमजवळ मारुती कारमध्ये दोघे संशयित गावठी कट्टे घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली, त्यानुसार ढोकणे यांनी तत्काळ गुन्हा शोध पथकाच्या सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस हवालदार शेवरे, गणेश रेहरे, चव्हाण, गुंबाडे, राठोड या कर्मचाऱ्यांना परिसरात गस्त घालण्यासाठी पाठविले. त्यावेळी मिळालेल्या वर्णनाची मारुती कार फिरताना आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरटीओ कार्यालयासमोर असलेल्या सप्तरंग सोसायटी येथे राहणाऱ्या संशयित मयूर रवींद्र ढवळे, व सातपूर शिवाजीनगर येथील आशिष सुनीलदत्त महिरे या दोघा संशयिताना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर मारुती कारची तपासणी करत अंगझडती घेतली असता संशयितांकडे एक गावठी कट्टा व पाच जिवंत काडतूस एक लाकडी दांडका आढळून आला.
पोलिसांनी तत्काळ दोघांना बेड्या ठोकत त्यांच्याकडून मारुती कारसह एक लाख दहा हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अटक केलेले संशयित गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यांच्यावर म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. संशयितांनी यापूर्वी कोणाला गावठी कट्टा विक्री केला का कोणाकडून विकत घेतला, त्यांनी कुणाचा घातपात करण्यासाठी गावठी कट्टा आणला होता का याबाबतचा तपास पोलीस करत आहेत.