नाशिक : दलितांवरील अत्याचाराची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, दलितांच्या संरक्षणार्थ अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करावा, मराठा व मुस्लीमांना आरक्षण द्यावे, अॅट्रॉसिटी अशा विविध मागण्यांसाठी येत्या शनिवारी (दि. १९) महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी पाचशे स्वयंसेवक सज्ज असून, बुधवारी (दि. १६) नियोजन बैठक घेण्यात आली.शनिवारी दलित, ओबीसी, मुस्लीम समाजाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या महामोर्चासाठी अवघे शहर सज्ज झाले आहे. गंजमाळ, पंचशीलनगर, भीमनगर, उपनगर, आंबेडकरनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प, विहितगाव परिसरात निळे ध्वज लावण्यात आल्याने संपूर्ण शहर निळ्या ध्वजांनी सजले आहे. तिडके कॉलनीमधील दुर्वांकूर लॉन्स येथे झालेल्या स्वयंसेवकांच्या बैठकीत नियोजनाची आखणी करण्यात आली. स्वयंसेवकांना विविध सूचना देण्यात आल्या. या महामोर्चासाठी पाचशे स्वयंसेवकांची तुकडी सज्ज झाली आहे. शहर व परिसरात महामोर्चाची जय्यत तयारी सुरू असून, गोल्फ क्लब मैदान येथून शनिवारी मोर्चाला सकाळी अकरा वाजता सुरुवात होणार आहे. या मोर्चामध्ये बौद्ध, इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती, मुस्लीम, ख्रिश्चन या सर्व जाती-धर्माच्या विविध संघटनांचा सहभाग असल्याची माहिती नियोजन समितीने दिली आहे. मोर्चासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेता निश्चित करण्यात आलेला मार्ग कमी पडण्याची शक्यता आहे. यामुळे नियोजन समितीकडून मार्ग लांबविण्याचा विचार सुरू असून नवीन मार्ग तयार करून पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांची समितीचे पदाधिकारी गुरुवारी (दि.१७) भेट घेणार आहे. गडकरी चौकातून मुंबईनाका, द्वारका, वडाळानाका, सारडासर्कल असा मार्ग वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)
पाचशे स्वयंसेवक महामोर्चासाठी सज्ज
By admin | Updated: November 17, 2016 00:46 IST