दिंडोरी : नाशिक-कळवण रस्त्यावरील नाशिक महापालिका हद्दीलगतच्या ढकांबे शिवारातील सचिन पेट्रोलियमच्या केबिनला लागलेल्या आगीत व्यवस्थापकाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या घटनेत अन्य तीन जण जखमी झाले आहे. नाशिक-कळवण रस्त्यावरील ढकांबे शिवारातील सचिन पेट्रोलियमच्या केबिनला सायंकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली. त्यानंतर केबिनच्या बाजूला असलेल्या आॅइलला आग लागली. आग अधिक भडकू नये यासाठी आॅइल ड्रम हलविण्याचा कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केला. मात्र यावेळी आॅइलने पेट घेतल्याने आग अधिक भडकली व या दुर्घटनेत पंपाचे आनंद काठे नामक व्यवस्थापक जळून मृत्युमुखी पडले आहे तर शरद पाटील, रवि पाटील (रा. सातपूर, नाशिक) जखमी झाले आहेत. जखमींवर नाशिक येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेचे वृत्त कळताच दिंडोरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमनच्या दोन बंबांनी आग आटोक्यात आणली. (वार्ताहर)
ढकांबे शिवारातील पेट्रोलपंपाला आग; एक ठार
By admin | Updated: March 25, 2016 23:40 IST