नाशिक : मनुष्य देहात अचाट शक्ती असून, त्या शक्तीच्या माध्यमातून माणूस अलौकिक कार्य करू शकतो, त्या देहाचे मोल जाणा, अशा शब्दात श्री श्री योगिराज महात्यागी मनिंदरदासजी खडेश्वरदास महाराज यांनी भाविकांशी संवाद साधला.सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त येथील साधुग्राममध्ये ते गेल्या महिनाभरापासून उभे आहेत. आयुष्यभर उभे राहण्याचे व्रत घेतलेले खडेश्वरदास महाराज दिवसभरात आलेल्या भक्तांशी संवाद साधतात. महिनाभरात असंख्य भाविक या महाराजांची भेट घेऊन गेले आहेत. गुरुवारी भाविकांशी संवाद साधताना त्यांनी मनुष्य देहाची ताकद आणि त्याचे पावित्र्य समजावून सांगितले. माणसाने विज्ञानाची मदत घेऊन मोठी प्रगती साधली आहे; परंतु विज्ञान शेवटी विनाशाकडेच घेऊन गेले आहे. विज्ञानाच्या माध्यमातून साधलेला विकास हा शेवटी भकास ठरला आहे. यापुढेही विज्ञानाची कास किती धरावी याचा सारासार विचार माणसाने करावा. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत माणूस शारीरिक कष्ट करून जे साध्य करतो, तेच खरे पुण्य आहे. हे पुण्य माणसाचे कल्याण साधेल यावरच विश्वास ठेवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी के ले. कस्तुरी हरणाच्या नाभीत असते; पण ती कस्तुरीच्या शोधार्थ रानोमाळ भटकंती करते. कस्तुरीच्या शोधासाठी गवतात जाते आणि त्याच सुमारास एखादा शिकारी तिची शिकार करतो. माणसाचेही तसेच आहे. त्याच्या शरीरात कस्तुरी आहे, पण ती त्याला पाहता येत नाही. यासाठी देवाने दिलेल्या शरीराचे पावित्र्य प्रत्येकाने राखावे. न्याहाळले तर प्रत्येक माणूस दिसायला सुंदर आहे. त्याचे निरीक्षण करा. भगवंताने आपल्याला शरीराच्या माध्यमातून कोणती शक्ती दिली आहे हे ओळखून या शरीराच्या माध्यमातून सत्कर्म करा पुण्य करण्याची संधी सोडू नका, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
मनुष्य देहात अचाट शक्ती, तिचा शोध घ्या
By admin | Updated: September 11, 2015 23:34 IST