नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यात बेमोसमी पाऊस व ढगाळ हवामानामुळे खरीप व रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सततच्या दुष्काळी परिस्थितीने नायगाव खोऱ्यातील शेतकरी आधीच आर्थिक विवंचनेत आहे. या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसाच्या भरवशावर घेतलेल्या पिकांवर बेमोसमी पाऊस व ढगाळ हवामानामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे खरीप व रब्बीच्या सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्यांमध्ये भर पडत आहे. खरिपातील लाल कांदा, कोबी, फ्लॉवर, तुरीसह रब्बीतील उन्हाळ कांदा, टमाटे, कोबी, फ्लॉवर, गहू या पिकांची बेमोसमी पावसाने वाताहत होत आहे. याशिवाय दरम्यान निर्माण होणाऱ्या ढगाळ हवामानामुळे या सर्वच पिकांवर विविध रोगांचे आक्रमण झाले आहे. ही पिके वाचविण्यासाठी महागड्या किटकनाशकांची फवारणी करावी लागत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.परिसरातील पाण्याची पातळी खालावत असताना धोक्यात आलेली पिके कशीबशी जगवण्याच्या धडपडीला बेमोसमी पावसाने हात दिला आहे. मात्र, ढगाळ हवामानामुळे या सर्वांवर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन-तीन दिवसांपासून धुक्याचे प्रमाण वाढत असल्याने शेतातील पिके पिवळी पडून खराब होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. धुक्याचे प्रमाण असेच राहिले तर शेतातील सर्वच पिके भुईसपाट होण्याची चिन्हे आहेत. शेतीसाठी पाणी असूनही पिके हातातून जाण्याच्या शक्यतेने या वर्षीचा रब्बी हंगाम शेतकऱ्यांना आर्थिक तोटा देणारा ठरणार असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)
नायगाव खोऱ्यातील शेतकरी आर्थिक संकटात
By admin | Updated: November 25, 2015 22:54 IST