सदस्यांचे राजीनामे : ५ जून रोजी होणार निवडणूकनाशिक : मनसेतील राजीनामा नाट्यामुळे तब्बल महिनाभरापासून रखडलेली स्थायी समिती निवडणूक अखेर महापौरांनी जाहीर केली असून, येत्या ५ जून रोजी निवडणूक होणार आहे. गेल्या २८ फेब्रुवारी रोजी स्थायीचे आठ सदस्य निवृत्त झाल्यानंतर नवीन सदस्य आणि स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक जाहीर करणे अपेक्षित होते; परंतु तब्बल तीन महिने उलटूनही महापौरांकडून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जात नव्हता. वास्तविक सदर निवडणूक ही मार्चमध्येच पार पडणे अपेक्षित होते. मात्र तरीही महापौरांकडून चालढकल केली जात असल्याने महापौरांवर टीकाही होत होती. सेनेचे गटनेता अजय बोरस्ते आणि विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांनी महापौरांची भेट घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची मागणीही केली होती; परंतु महापौरांकडून आश्वासनाव्यतिरिक्त कोणतीही हालचाल होताना दिसत नव्हती. महापौरांकडून तांत्रिक अडचणी आणि निवडणूक आचारसंहितेचे कारणही पुढे करण्यात येत असल्याने महापौरांची राजकीय इच्छाशक्तीच नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. मनसेतील अंतर्गत मतभेद आणि राजीनामा देण्याच्या मुद्यावर ही निवडणूक पुढे ढकलली जात असल्याचा आरोप होत असतानाच आज महापौरांनी निवडणूक जाहीर केली. मनसेचे रमेश धोंगडे, सुमन ओहळ, रेखा बेंडकुळे, सुदाम कोंबडे यांनी, तसेच राष्ट्रवादीचे कल्पना चुंबळे, हरिष भडांगे, सुनीता निमसे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सात जागांसाठी आता निवडणूक घेण्याचे निित करण्यात आले. त्याची अधिकृत घोषणा महापौर ॲड. यतिन वाघ यांनी केली आहे. स्थायी समितीची निवडणूक जाहीर झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर निवड व्हावी, यासाठी मनसेच्या नगरसेवकांमध्ये चुरस असून इच्छुकांची संख्या मोठी असल्याने मनसेच्या पदाधिकार्यांची डोकेदुखी वाढली आहे. यातून मार्ग काढण्यात आल्याचा दावा महापौरांनी केला आहे किंबहुना इच्छुकांची मनधरणी झाल्यानंतरच राजीनामे घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सदस्यांच्या राजीनामा मंजुरीसाठी विशेष महासभा बोलवावी लागणार आहे. (प्रतिनिधी)
अखेर स्थायीची निवडणूक जाहीर
By admin | Updated: May 29, 2014 00:47 IST