नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या बहुचर्चित दोन कोटी रुपयांच्या मालवाहतूक चारचाकी वाहन खरेदीला अखेर बुधवारी (दि. ७) समाज कल्याण आयुक्त पीयूष सिंह यांनी तांत्रिक मान्यता दिली आहे. गेल्या वर्षभरापासून बेरोजगार युवकांना रोजगारासाठी चारचाकी मालवाहतूक वाहन खरेदी करण्याची योजना मंजुरीच्या प्रतीक्षेत होती.जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती उषा बच्छाव यांनी जिल्हा परिषदेत झालेल्या ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या आढावा बैठकीत या दोन कोटी रुपयांच्या चारचाकी मालवाहतूक वाहन खरेदीच्या विषयाकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर राज्यमंत्री दादा भुसे यांनी स्वत: पुढाकार घेऊन येत्या १५ दिवसांत याबाबतची कार्यवाही करावी, असे सांगत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना पत्र देऊन या विषयास मंजुरी देण्याबाबत विनंती केली होती. त्याच दरम्यान नाशिक दौऱ्यावर आलेले समाजकल्याण विभागाचे आयुक्त पीयूष सिंह यांना निवेदन देऊन सभापती उषा बच्छाव यांनी या दोन कोटी रुपयांच्या चारचाकी मालवाहतूक खरेदीला तांत्रिक मान्यता दिल्यास वेळेत हा निधी खर्च होणार असल्याकडे लक्ष वेधले होते. या दोन कोटी रुपयांच्या निधीतून जिल्हा परिषदेच्या ७३ गटांमध्ये ७३ वाहन खरेदीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने तयार केला होता.या प्रस्तावास बुधवारी समाजकल्याण आयुक्त पीयूष सिंह यांनी मान्यता दिल्याने दोन कोटींच्या निधी खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता समाजकल्याण आयुक्तांनी या दोन कोटीतून चारचाकी मालवाहतूक वाहन खरेदीस तांत्रिक मान्यता दिल्याने जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून या वाहन खरेदीसाठी निविदाप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
दोन कोटींच्या वाहन खरेदीला अखेर मान्यता
By admin | Updated: September 8, 2016 01:02 IST