लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिकला वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी ‘बीआरटीएस’ अर्थात बस रॅपीड ट्रान्झिट सिस्टम राबविण्यासंबंधी विशिष्ट गट आग्रही असतानाच अर्बन मास ट्रान्झिट कंपनीने महापालिकेला सादर केलेल्या प्राथमिक अहवालात ‘बीआरटीएस’ संकल्पना ही अव्यवहार्य असल्याचे स्पष्ट करत त्यावर फुली मारली आहे. मात्र, शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी बसेसची संख्या तातडीने वाढविणे गरजेचे असल्याचा सल्लाही कंपनीने दिला आहे. नाशिकच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत बीआरटीएस ही संकल्पना अंमलात आणण्यासाठी यापूर्वीही यतिन वाघ यांच्या महापौरपदाच्या कारकिर्दीत प्रयत्न झाले होते. आयटीडीपी या संस्थेने त्याचे सादरीकरणही केले होते. त्यानुसार, अहमदाबाद येथील बीआरटीएस प्रकल्पाची पाहणी करण्यात आली, परंतु महासभेने सदरचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. आता परत एकदा बीआरटीएस ही संकल्पना पॉलीस करून वेगळ्या पद्धतीने द्वारका-नाशिकरोड या दरम्यान राबविण्याचे प्रयत्न काही संस्थांमार्फत सुरू झाले असताना, महापालिकेला अर्बन मास ट्रान्झिट कंपनीने दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार, बीआरटीएस संकल्पना अव्यवहार्य नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. अहवालात प्रामुख्याने, शहरात बीआरटीएस ज्या रस्त्यांवर राबवायची तेथे पुरेशी प्रवासी घनता नाही. रस्त्यांची रुंदीही कमी आहे. त्यामुळे कंपनीने सदर संकल्पनेला कमी गुणांकन दिले आहे. त्याऐवजी, कंपनीने शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होणेसाठी बसेसची संख्या वाढविण्यावर भर देण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे. शहरात कमीत कमी ८०० बसेसची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत २४८ बसेसच धावत आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करायची असेल तर ताबडतोब ५५० बसेस वाढविण्याची गरज आहे. सदर व्यवस्थेत बदल झाला तरच वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होऊ शकेल, असा दावा कंपनीने केला आहे. अर्बन मास ट्रान्झिट कंपनीने प्राथमिक अहवाल महापालिकेला सादर केलेला आहे. अनेक शिफारसी, सूचना आहेत. त्यात बीआरटीएसला कमी गुणांकन दिले आहे. नाशिकच्या रस्त्यांची स्थिती पाहता बीआरटीएस राबविणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. पुढील महिन्यात पुन्हा वाहतूक नियोजन आराखड्यावर पुन्हा बैठक होईल. - अभिषेक कृष्ण, आयुक्त, मनपा
‘बीआरटीएस’वर फुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:11 IST