नाशिक : शहरात डेंग्यूच्या आजाराने अद्यापही ठाण मांडले असून, दि. १ ते २५ सप्टेंबर या कालावधीत ५५५ संशयित रुग्णांच्या रक्तजलनमुना तपासणीनंतर १८७ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. डेंग्यूच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस भरच पडत चालल्याने नागरिकही भयभीत झाले आहेत. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दखल घेतल्यानंतर महापालिकेने राबविलेल्या विशेष कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून राबविलेले प्रयत्न तोकडे पडत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन- अडीच वर्षांपासून शहरात डेंग्यूने नाशिककरांची पाठ सोडलेली नाही. राज्यात मुंबई, पुण्यासह नाशिक शहरात डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी त्याची गंभीर दखल घेत महापालिकेला १२ ते २३ सप्टेंबर या कालावधीत विशेष कृती कार्यक्रम राबविण्याचे आदेशित केले होते. त्यासाठी महापालिकेने ७२ पथके तयार करून घरोघरी भेट देण्याचा कार्यक्रम राबविला. एकीकडे आरोग्य विभागाकडून कृती कार्यक्रम प्रभावीपणे राबविला जात असल्याचा दावा केला जात असला तरी दुसरीकडे डेंग्यूच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक भरच पडते आहे. दि. १ ते २५ सप्टेंबर या कालावधीत ५५५ संशयित रुग्णांच्या रक्तजलनमुन्यांची तपासणी केली. नगरसेविकेच्या घरात डेंग्यूरुग्णमहापालिकेचे नगरसेवक डेंग्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत वारंवार आरोग्य विभागाला जाब विचारत असतात, परंतु आता नगरसेवकांच्या घरापर्यंतही डेंग्यू जाऊन पोहोचला आहे. टाकळीरोड परिसरातील मनसेच्या नगरसेवक मेघा साळवे यांच्या नऊ वर्षाच्या मुलालाही डेंग्यूची लागण झाली असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परिसरात धूर व औषध फवारणीबाबत आरोग्याधिकारी डॉ. डेकाटे यांना वारंवार मागणी करूनही दखल घेतली जात नाही. नगरसेवकांचे फोनही घेतले जात नसल्याची तक्रार साळवे यांनी केली आहे. यापूर्वी सिडकोतील मनसेच्याच नगरसेवक अर्चना जाधव यांचे पती संजय जाधव यांचा डेंग्यूने बळी घेतला आहे. लोकप्रतिनिधींच्या तक्रारींकडेही आरोग्य विभाग गांभीर्याने पाहत नाही तर सामान्य नागरिकांची काय व्यथा असेल, असा प्रश्न त्यानिमित्ताने उपस्थित होतो आहे.
‘ताप’दायक डेंग्यू, रुग्णसंख्येत वाढ
By admin | Updated: September 27, 2016 00:56 IST