नाशिक : दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्रावर अखेर वरुणराजाची कृपादृष्टी झाली असून, बळीराजा सुखावला आहे. राज्यभरातील सर्वच धरणे हाउसफुल्ल झाल्याने पीक उत्पादनासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, जायकवाडी धरणात आतापर्यंत ५० टक्के पाणी पोहचल्याची माहिती राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.समाधानकारक पावसाच्या हजेरीनंतर राज्यभरातील धरणांचा जलसाठा वाढला असून, पाण्याचे नियोजन व पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत पोहचविण्याबाबत महाजन यांनी शहरातील शासकीय विश्रामगृहावर अधिकारीवर्गाची बैठक बोलविली होती. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, राज्यात सर्वदूर पाऊस समाधानकारक होत असताना नंदुरबार जिल्ह्याची चिंता होती; मात्र नंदुरबारमध्येही पावसाला दोन दिवसांपासून सुरुवात झाली आहे. पावसामुळे राज्यातील लहान-मोठी धरणे भरली आहेत.
धरणे भरल्याने अनुकूल वातावरण
By admin | Updated: August 8, 2016 01:16 IST