जिल्ह्यात पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

By admin | Published: July 8, 2014 12:47 AM2014-07-08T00:47:46+5:302014-07-08T00:53:18+5:30

जिल्ह्यात पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

The farmers of the district thrive in the hope of rain | जिल्ह्यात पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

जिल्ह्यात पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

Next

 

निफाड : पावसाने तब्बल एक महिना उशिराने म्हणजे ७ जुलैला निफाड व परिसरात सायंकाळच्या सुमारास जवळ जवळ दोन तास हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
गेली चार महिने सूर्यनारायणाने निफाड तालुक्याला भाजून काढले होते. त्यात ७ जूनला प्रारंभ होणाऱ्या पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांत चिंतातुर वातावरण पसरले होते. त्यात वादळी वाऱ्याने सर्वांनाच हैराण करून सोडले होते. सकाळपासूनच वातावरण ढगाळ व दमट होते. सायंकाळी ४च्या सुमारास पावसाने निफाड, जळगाव, काथरगाव, कोठुरे, कुरूडगाव, कोळवाडी, शिवरे, सोनेवाडी, उगाव, शिवडी, खेडे आदिंसह इतर गावांमध्ये चांगली हजेरी लावली. सायंकाळी ६ च्या सुमारास मात्र मुसळधार पावसाने निफाड शहराला चांगलेच झोडपल्याने निफाडमधील रस्त्यावरून पाणी वाहत होते. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, पावसाने दोन चार दिवस हजेरी लावल्यास सोयाबीन पेरणी करता येईल शिवाय ऊस लागवडीला प्रारंभ करता येईल.
ओझर परिसरात पाऊस
ओझरटाऊनशिप : गेल्या महिनाभरापासून पावसाची वाट बघणाऱ्या ओझरकरांना आज पावसाने चिंब भिजविले. आज सांयकाळी पाऊस आल्यानंतर ओझर व परिसारतील नागरिकांची एकच धावपळ उडाली. दुष्काळाचे सावट तयार झाले असल्यामुळे आजचा पाऊस आल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले रस्ता डांबरीकरणाचे काम अंतिम टप्यात आले असून भर पावसात हेकाम सुरू होते. पाऊस पडणार असे दिवसभर वातावरण होते. परंतू तो पडेलच अशी खात्री कुणालाही नव्हती. मुसळधार नसला तरी जितका पाऊस पडला त्याने जमिन चांगली ओली केली. यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
पावसाची हजेरी
त्र्यंबकेश्वर : नेहमीच्या अनुभवाप्रमाणे मृग नक्षत्रात थोडाफार पाऊस पडतो, पण आर्द्रा हे नक्षत्र पूर्णत: पावसाचे असून, या नक्षत्रात पावसाचे प्रमाण भरभरून राहते. पण यावर्षी तब्बल एक महिन्यात पावसाचा मागमूस नाही. दोन नक्षत्रे कोरडी गेली. आज मात्र सायंकाळी सव्वापाच ते साडेसहापर्यंत पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली.
यावर्षी सुरुवातीच्या काळात काही दिवस डोंगरावर धुके होते. पण आता तेही गायब झालेत. आज झालेल्या एक तास पावसामुळे डोंगरही झाकोळले आहेत. ते असेच राहिल्यास पावसाचे सातत्य अधूनमधून राहते, असे येथील जाणकार सांगतात.
दरम्यान, यावर्षी मात्र कृषी विभाग, जिल्हा परिषद कृषी विभाग स्वत: शेतकरी बांधव यांनी खरिपाचे नियोजन केले असून, खते, अन्य कृषी उपयुक्त साहित्य ही उपलब्ध करून दिले आहेत. मागील वर्षापेक्षा यावेळी खरीप हंगामाचे पेरणी क्षेत्रात वाढ केली आहे. आता बैलांपेक्षा यांत्रिक शेतीवर शेतकऱ्यांचा भर असल्याचे दिसून येत आहे. असाच पाऊस सलग ५/६ दिवस पडत राहिल्यास आवणीची कामे सुरू होतील. शेतकामांना वेग येईल.
ठेंगोडा येथे मुसळधार पाऊस
ठेंगोडा : येथे सोमवारी दुपारच्या सुमारास मुसळधार पावसाचे आगमन झाल्यामुळे बळीराजा काहीसा सुखावला आहे. पहिलाच पाऊस चांगला बरसला असला तरी, तीन ते चार दमदार पावसाची अपेक्षा शेतकरी-वर्गाकडून करण्यात येते आहे. (लोकमत चमू)

Web Title: The farmers of the district thrive in the hope of rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.