दहिवड : देवळा तालुक्यातील भौरी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात सोमवारी सकाळी तरुण शेतकरी गंभीर जखमी झाला असून, या घटनेने दहिवड, रामनगर परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे.दहिवड येथील भौरी शिवारात वाघ आल्याची बातमी पसरल्याने मोठमोठ्याने होणारा आवाज ऐकून कैलास त्र्यंबक बढे व नानाजी रतन सोनवणे हे युवक आपल्या शेतातून बिबट्याला हाकलण्यासाठी जात असताना समोरून आलेल्या बिबट्याने कैलास बढे (३५) याच्यावर हल्ला केला. त्यात कैलासच्या उजव्या खांद्याला, हाताला बिबट्याने चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला.कैलास व नानाजी यांनी आरडाओरड करून परिसरातील नागरिकांच्या मदतीने बिबट्या हुसकावून लावला. या हल्ल्यात जखमी झालेल्या कैलास यास दहिवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. दहिवड येथील भौरी, गुरदडी, ओबारा या डोंगर कठडी शेजारील शिवारात अधून-मधून बिबट्या दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. या घटनेने अजूनच दहशत पसरल्याने लोक घराबाहेरदेखील निघत नाहीत तरी वनविभागाने परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
बिबट्याच्या हल्ल्यात भौरी येथे शेतकरी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2016 00:58 IST