नांदूरशिंगोटे: कृषिपंप सुरू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना सिन्नर तालुक्यातील दोडी-दापूर रस्त्यावरील काकड वस्तीत घडली. सुमारे साडेपाच तास चाललेल्या थरारानंतर बिबट्याने जंगलाकडे धूम ठोकली. या घटनेमुळे भयभीत झालेल्या ग्रामस्थांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.दापूर येथील मोहन पांडुरंग आव्हाड (४०) हे रविवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास आपल्या शेतातील विहिरीवर कृषिपंप सुरू करण्यासाठी गेले होते. विहिरीजवळील झुडपात हालचाल होत असल्याचे जाणवून बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज आला. काकड तेथून निघण्याच्या तयारीत असतानाच क्षणार्धात बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे घाबरलेल्या काकड यांनी आरडाओरडा करत बिबट्याला प्रतिकार सुरू केला. सदर प्रकार परिसरातील शेतकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनीही आरडाओरडा करत तिकडे धाव घेतली. ग्रामस्थांची गर्दी झाल्यामुळे बिबट्याने काकड यांना सोडून देत पुन्हा झुडपाचा आश्रय घेतला. बिबट्याच्या हल्ल्याची वार्ता गावात पसरताच घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली. ग्रामस्थांच्या आरडाओरडीमुळे बिबट्या झुडपातून बाहेर पळाला. यावेळी सागर शंकर आव्हाड (२०) या युवकासमोर बिबट्या ठाकला. तथापि, सावध असलेल्या सागरने आक्रमक पवित्रा घेतल्याने बिबट्या तेथून पसार झाला. (वार्ताहर)
बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
By admin | Updated: April 17, 2016 22:33 IST