नाशिक : सिंहस्थाच्या पहिल्या पर्वणीमध्ये शहरात जागोजागी केलेली रस्तेबंदी, बॅरिकेडिंग यामुळे भाविकांबरोबरच नाशिककरांचेही प्रचंड हाल झाले़ या पोलिसी अतिरेकाबाबत माध्यमांनी चौफेर टीका केल्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी (दि़३०) जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह पोलीस अधिकाऱ्यांची चिंतन बैठक घेतली़ या बैठकीमध्ये पुढील दोन्ही पर्वण्यांमध्ये भाविकांना कमीत कमी त्रास होईल, असा बंदोबस्त ठेवण्याचे अर्थात फेरनियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले़पालकमंत्री म्हणाले की, पहिल्या पर्वणीसाठी भाविकांची गर्दी ही तशी कमीच असते़ मात्र, प्रशासनाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार सुमारे २० लाख भाविकांनी गोदाघाटांवर स्नान केले आहे़ सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गर्दी वाढल्यामुळे सैल केलेली बॅरिकेडिंग पोलिसांना पुन्हा सुरू करावी लागली़ पोलिसांच्या नियोजनामुळेच पहिल्या पर्वणीकाळात रामघाट वा शहरात कोणतीही दुर्घटना घडली नाही़शहरात पर्वणीसाठी आलेल्या भाविक व नाशिककरांची मोठी परवड झाली़ भाविकांची मोठी पायपीट झाली़ त्यामुळे पुढील दोन्ही पर्वण्यांमध्ये भाविकांची ही पायपीट कमी व्हावी, नाशिककरांनाही अतिरक्त बंधन वाटू नये अशा प्रकारे नियोजन करून पायी अंतर कमी कसे करता येईल याबाबत जिल्हा प्रशासन व पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत़ मुळात सर्वच भाविकांची इच्छा रामकुंडामध्ये स्नान करण्याची आहे़ मात्र बॅरिकेडिंग व पोलीस बंदोबस्त ठेवला नाही व सर्व भाविकांना एकाच वेळी रामकुंडावर सोडले तर दुर्घटना नक्कीच होऊ शकते़१३ सप्टेंबर व १९ सप्टेंबरच्या पर्वणीसाठी येणारे भाविक व नाशिककर त्रासमुक्त कसे होतील, याबाबत फेरनियोजन करण्याच्या सूचना या बैठकीत दिल्याचेही पालकमंत्री महाजन यांनी सांगितले़ या बैठकीस आमदार बाळासाहेब सानप, विभागीय आयुक्त एकनाथ डौले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक जयजितसिंह, पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस अधिकारी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
पुढील शाही पर्वण्यांसाठी फेरनियोजन
By admin | Updated: August 30, 2015 23:20 IST