नाशिक- सायकल कॅपिटल ऑफ इंडिया असे नाशिकबद्दल सायकल चळवळीतील कार्यकर्ते म्हणत असले तरी प्रत्यक्षात सायकल ट्रॅक बांधूनही त्याचा उपयोग होत नाही. महापालिकेने कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही हे ट्रॅक वापराविना पडून आहेत.
नाशिकमध्ये सायकलींची चळवळ फोफावली आहे. त्यामुळे केवळ शहराच्या बाहेर सायकलीच चालवू नये तर सायकल चालवणे ही एक जीवनशैली ठरावी यासाठी प्रयत्न सुरू झाले. नाशिक महापालिकेच्या वतीनेही सायकल चळवळीला पाठबळ देण्याचा प्रयत्न केला. त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ हा गाजलेला स्मार्ट रोड तयार करताना दुतर्फा सायकल ट्रॅक तयार करण्यात आला आहे. मात्र, परिसरातील शाळांचा विचार करून केला असला तरी या ठिकाणी मोटारसायकल ट्रॅक झाला आहे. इतक्या गर्दीत ट्रॅकवरून सायकल घेऊन कोणी जाऊच शकत नाही. गोल्फ क्लबजवळ एक सायकल ट्रॅक साकारण्यात आला असला तरी त्याचा वापर अजून सुरू नाही. गोल्फ क्लबमध्येच आणखी एक सायकल ट्रॅक असून, त्याचाही वापर सुरू झालेला नाही.
कृषिनगरजवळ लोकनेते उत्तमराव कांबळे जॉगिंग ट्रॅक साकारण्यात आला असला तरी त्याचाही वापर झालेला नाही. अशाच प्रकारे इंदिरानगर येथील सायकलिस्ट बिरदी यांच्या नावाने साकारण्यात आलेला सायकल ट्रॅक उद्घाटनाविना पडून आहे
नाशिकमध्ये सायकल चळवळ वाढली पाहिजे, ती चळवळ आरोग्य आणि पर्यावरणस्नेही असल्याने ती वाढवण्याविषयी गैर नाही. मात्र, आहे त्या सुविधांचा कोणाचा वापर होत नसल्याचे तूर्तास दिसत आहे.
कोट..
महापालिकेने सायकल ट्रॅक केले ही चांगली बाब आहे. त्यातील अनेक ट्रॅक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. अशाप्रकारच्या वेगळ्या संकल्पना राबवताना सायकलिंगसंदर्भातील संघटनांशी चर्चा केली तर या विषयावर जागृतीदेखील करता येईल.
राजेंद्र वानखेडे, अध्यक्ष, नाशिक सायकलिस्ट
इन्फो...
नाशिक शहरात सायकल ट्रॅक तयार असले तरी त्याचा वापर होत नाही आणि दुसरीकडे मात्र गंगापूर धरणाजवळ सायकल चालवण्यासाठी गेल्यानंतर अनेकांना कारवाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शहरातदेखील दैनंदिन कामकाजासाठी सायकलींचा वापर वाढला पाहिजे, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.