नाशिकरोड/इंदिरानगर : क्राईम ब्रॅँच युनिट तीनच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून सव्वाचार लाखांच्या बनावट नोटा विकणाऱ्या दोघा जणांना अटक केली आहे. क्राईम ब्रॅँच युनिट तीनचे जाकीर शेख यांना इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ दोघे युवक संगणकावर स्कॅन करून कागदावर प्रिंट मारलेल्या १०० रुपयांच्या बनावट नोटा निम्म्या किमतीत विकण्यासाठी येत असल्याची गुप्त खबर मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय सानप, सहायक पोलीस निरीक्षक जी. डी. देवडे, सुभाष गुंजाळ, संदीप भाबड, रमीझ शेख, विलास गांगुर्डे, गंगाधर केदार, रेवगडे, इरफान शेख, मोहन देशमुख, शंकर गडदे, शांताराम महाले, संतोष कोरडे, ललित आहेर आदिंनी शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक सती आसरा देवीच्या मंदिराजवळ सापळा रचला. यावेळी काळ्या रंगाची पॅशन (एमएच १५, एटी ५५२७) हिच्यामधून दोघे युवक मंदिराजवळ संशयास्पदरीत्या आले. त्यांच्याकडे पांढऱ्या रंगाची गोणी होती. सापळा रचलेल्या पोलिसांनी त्या दोघा संशयितांकडे एका गिऱ्हाईकास पाठविले. सदर गिऱ्हाईकास १०० रुपयांच्या संगणकावर स्कॅन करून प्रिंट मारलेल्या बनावट नोटा (एक नोट ५० रुपये दराने) देत असताना सापळा रचलेल्या पोलिसांनी त्या दोघांना पकडले. संशयित ज्ञानेश्वर सीताराम पाटील (३३) रा. भोर टाऊनशिप, अंबड लिंकरोड, सातपूर, जावेद कादीर मनियार (४०) रा. हरिष रेसिडेन्सी, विजयनगर बस स्टॉपजवळ, साईनाथनगर यांच्या जवळील पांढऱ्या रंगाच्या गोणीची झडती घेतली. त्या गोणीमध्ये १०० रुपयांचे व्यवस्थित बंडल केलेल्या ४ लाख २० हजार रुपयांच्या बनावट नोटा मिळून आल्या. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघा संशयितांना आज न्यायालयासमोर हजर केले असता मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)