नाशिक : येथील एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे त्यांच्याच महाविद्यालयातील प्राध्यापिकेच्या प्रमाणपत्राची नक्कल आढळून आली आहे. दोन्ही प्रमाणपत्रावरील सर्व माहिती सारखी असून, केवळ नावांत बदल करण्यात आला आहे. ‘टीचिंग, लर्निंग कम्युनिकेशन’ यावरील ओरिएन्टेशन प्रोग्रामचे हे प्रमाणपत्र असून, संबंधित प्राध्यापिकेने यात सहभाग घेतला होता. तर प्राचार्य या प्रोग्रामला हजर नसतानाही त्यांच्या नावाचे बनावट प्रमाणपत्र तयार झाल्याचे निदर्शनास आले आहे. अनुदान आयोगाने प्राध्यापकांनी विविध प्रकारची चर्चासत्र तसेच परिषदा तसेच विविध ओरिएन्टेशन कोर्स करणे सक्तीचे केले आहे. त्याचे प्रमाणपत्रही संबंधित प्राध्यापकांना दिले जाते. हे प्रमाणपत्र पदोन्नती तसेच वेतनवाढीसाठी उपयुक्त ठरते. नाशिक येथील केटीएचएम महाविद्यालयाने प्राध्यापकांसाठी २००८ मध्ये प्रोग्रामचे आयोजन केले होते. त्यात एनडीएमव्हीपी कॉलेज आॅफ सोशल वर्कमधील प्रा. प्रतिभा पगार यांचाही समावेश होता. त्यांना तसे प्रमाणपत्रही मिळाले आहे. याच महाविद्यालयाचे प्राचार्य विलासकुमार देशमुख यांच्या नावाचे हुबेहुब असेच प्रमाणपत्र असून त्याचा क्रमांकही सारखाच आहे.बनावट प्रमाणपत्रावर केवळ नावात बदल करण्यात आला आहे. पगार यांच्याऐवजी त्यावर देशमुख यांचे नाव आहे. याबाबत प्रबोधिनीला तक्रार आली होती. या तक्रारीची दखल घेत प्रबोधनीने सर्व प्रकाराची तपासणी केली. याबाबत बोलताना प्रबोधिनीचे प्रमुख डॉ. संजीव सोनवणे म्हणाले, चौकशीदरम्यान ओरिएन्टेशन प्रोग्राममध्ये उपस्थित प्राध्यापकांची माहिती घेण्यात आली. प्रा. प्रतिभा पगार याच या प्रोग्रामला उपस्थित होत्या. त्यामुळे देशमुख यांच्या नावाने तयार झालेले प्रमाणपत्र बनावट असल्याचे स्पष्ट होते. प्रमाणपत्र बनावट असल्याचे दिसत असल्याने ही विद्यापीठाची फसवणूक आहे. तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्याने तसा अहवाल कुलगुरूंकडे सादर करण्यात आला आहे. या अहवालावरून कुलगुरू काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)—-———————