मनमाड : पुणे येथे झालेल्या बॉम्ब-स्फोटाच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या स्थळांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार उत्तर भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमाड रेल्वे जंक्शन, रेल्वे कारखाना आदि ठिकाणी रेल्वे सुरक्षा बलाचे जवान ‘हिरो’ श्वानाच्या मदतीने प्रवाशांच्या सामानाची कसून तपासणी करत आहेत.मनमाड हे प्रमुख रेल्वे जंक्शन तसेच देशातील प्रमुख शीख धर्मीयांचे गुरुद्वारा, भारत पेट्रोलियम, हिन्दुस्तान पेट्रोलियमची इंधन साठवणूक केंद्र, आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे भारतीय अन्नमहामंडळाचे साठवणून केंद्र, रेल्वेचा पूलनिर्मिती कारखाना यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रमुख संवेदनशील शहर बनले आहे. या सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. रेल्वे-स्थानकावरील सर्व एक ते सहा फलाट, बुकिंग कार्यालय, आरक्षण कार्यालय, वेटिंग रूम, पार्सल कार्यालय आदि ठिकाणी श्वान पथकाच्या साहाय्याने कसून तपासणी करण्यात येत आहे. स्थानकावर येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्यांमध्ये तपासणी करण्यात येत आहे. रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक बाबासाहेब नेटके, उपनिरीक्षक नरहरी गरवळ, सैनी, पोलीस निरीक्षक के. एस. जांभळे, हेमंत घरटे, रमेश पवार, अरुण गायकवाड यांच्या पथकाने हिरो श्वानाच्या मदतीने तपासणीचे काम करण्यात येत आहे. (वार्ताहर)
मनमाड जंक्शनवर ‘हिरो’ची नजर
By admin | Updated: July 12, 2014 00:28 IST