लासलगाव : भारतातून कांदा निर्यातीसंबंधी चालू असलेल्या कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेची मुदत दि. ३१ मार्च २०१७पर्यंत वाढविली असल्याने कांदा बाजारभावाची पातळी स्थिर राहण्याच्या दृष्टीने मदत होईल, अशी माहिती लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी दिली. भारतातून कांदा निर्यातीसंबंधी चालू असलेल्या एमईआयएस योजनेची वाढविण्याबाबत दिल्लीत सभापती जयदत्त होळकर यांनी वाणिज्य व परराष्ट्र व्यापारमंत्री निर्मला सीतारामन व परदेश व्यापार मंत्रालयात संचालक ए.के. भल्ला यांची समक्ष भेट घेतली व कमी झालेल्या कांदा भावाची माहिती देऊन मुदत वाढवावी, अशी मागणी केली. त्यामुळे दि. ३० डिसेंबरला रात्री उशिरा अधिसूचना परदेश व्यापार मंत्रालयात संचालक ए.के. भल्ला यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आली. या योजनेची मुदत दि. ३१ डिसेंबर, २०१६ रोजी संपुष्टात येत असल्याने कांदा बाजारभावाची पातळी स्थिर राहण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने सदर योजनेची मुदत वाढवावी, अशी मागणी लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी मागील सप्ताहात केली होती. केंद्र शासनाच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील वाणिज्य विभागाच्या विदेश व्यापार महानिदेशालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार भारतातून व्यापारी वस्तूंच्या निर्यातीसंबंधी असलेल्या एमईआयएस योजनेंतर्गत दि. ३१ डिसेंबरपर्यंत पाठविण्यात येणाऱ्या कांद्यास ५ टक्के एमईआयएस दर लागू राहील, असे केंद्र शासनाने जाहीर केलेले होते. मात्र सदर योजनेची मुदत शनिवारी संपणार असल्याने त्यापूर्वी केंद्र शासनाने सदर योजनेची मुदत न वाढविल्यास त्याचा कांदा निर्यातीवर परिणाम होऊन पर्यायाने कांदा दरात घसरण होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)
कांदा निर्यात योजनेस मुदतवाढ
By admin | Updated: December 31, 2016 22:56 IST