कसबे सुकेणे : येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात दिवसा व रात्रीच्या वेळी मद्यपी मद्यसेवन करत बाटल्या उघड्यावर फेकत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. या मद्यपींवर कारवाई करावी, अशी मागणी कसबे सुकेणे ग्रामपालिकेने लेखी तक्रारीव्दारे पोलिसांकडे केली आहे.
कसबे सुकेणे बसस्थानकाजवळील जिल्हा परिषद मराठी शाळा सध्या मद्यपींचा अड्डा बनली आहे. या ठिकाणी मद्यपी सर्रासपणे मद्यसेवन करत त्याच ठिकाणी मद्याच्या बाटल्या फेकून देत असल्याने पालक व ग्रामस्थांत संताप व्यक्त होत आहे. शाळा व मैदानावर मोठ्या प्रमाणात बाटल्यांचा खच काचा दिसत आहेत. मैदानावर सराव करताना तरुणांना दुखापत होत आहे. गावाच्या दृष्टीने हा प्रकार अतिशय चिंताजनक व संतापजनक आहे. कसबे सुकेणे ग्रामपालिकेचे उपसरपंच धनराज भंडारे यांनी सांगितले की, आम्ही याबाबत पोलिसांना वेळोवेळी निवेदने देऊनही कारवाई होत नाही. पोलिसांनी सार्वजनिकस्थळी मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान शुक्रवारी पुन्हा ग्रामपालिकेने याबाबत कसबे सुकेणे पोलिसांना माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. जिल्हा परिषद शाळेबरोबरच बाजारतळ, जलकुंभ, क्रीडा मैदान, बानगंगा नदीकाठचा परिसर या परिसरातील उघड्यावर गावातील व परिसरातील मद्यपी मद्यपान करत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पोलिसांचा परिसरात वचक नसल्याने अशा घटना वारंवार घडत असल्याचे बोलले जात आहे. ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व कसबे सुकेणे पोलीस दूरक्षेत्र पोलिसांनी याबाबत दखल घेऊन उघड्यावर मद्यपान करणारे, मद्यविक्री करणारे यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी कसबे सुकेणे ग्रामपालिकेसह नागरिक व महिलांनी पोलिसांकडे केली आहे. (२४ कसबे सुकेणे)
240921\24nsk_5_24092021_13.jpg
२४ कसबे सुकेणे