नाशिक : मालेगावला झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्यमंत्री दादा भुसे यांनी आपला मंत्रिपदाचा राजीनामा यापूर्वीच पक्षप्रमुखांकडे सोपविला असून, उर्वरित दोन अडीच वर्षांसाठी त्यांच्याऐवजी सिन्नरला राज्यमंत्रिपद देण्याची चर्चा घडून येत आहे. याच चर्चेतून मग जिल्हा परिषद अध्यक्षपद सिन्नरऐवजी येवल्याला जाणार असल्याचेही बोलले जात आहे.दरम्यान, शिवसेना-कॉँग्रेस अशी आघाडीची चर्चा सुरू असतानाच शुक्रवारी (दि.१०) शिवसेना व राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित सदस्यांनी अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची खलबते केल्याने शिवसेना-राष्ट्रवादी असे नवीन समीकरण समोेर आले आहे.राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बागलाण तालुक्यात आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी गेले होते. तर शिवसेनेचे नेते मुंबईला अधिवेशनात असल्याने शिवसेना-राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत कोणी दुजोरा दिला नाही. शिवसेनेकडून अध्यक्षपदासाठी येवल्यातून माजी आमदार मारोतराव पवार यांच्या स्नुषा सविता पवार तसेच जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या पत्नी सुरेखा दराडे, सिन्नर तालुक्यातून उदय सांगळे यांच्या पत्नी शीतल सांगळे व तालुकाप्रमुख दीपक खुळे यांच्या पत्नी वैशाली खुळे तसेच पेठ तालुकाप्रमुख जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित यांच्या स्नुषा हेमलता गावित आदिंची नावे आघाडीवर आहेत. त्यातच सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे यांना लालदिवा मिळणार असल्याच्या चर्चेने जोर धरल्याने सिन्नरची जिल्हा परिषदेतील लाल दिव्याची दावेदारी मागे पडू शकते, असे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)
मंत्रिपदाच्या अपेक्षेने अध्यक्षपदाला हुलकावणी?
By admin | Updated: March 11, 2017 02:19 IST