लोकमत न्यूज नेटवर्कसातपूर : प्रलंबित वेतन वाढीचा करार पूर्ण करावा यासाठी महिंद्र अॅन्ड महिंद्र कंपनीतील कामगारांनी बहुमताने विद्यमान युनियन पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्याचा ठराव वार्षिक सर्वसाधारण सभेत संमत केला आहे. येथील महिंद्र अॅन्ड महिंद्र एम्प्लॉईज युनियनची वार्षिक सर्वसाधारण सभा दादासाहेब गायकवाड सभागृहात अध्यक्ष योगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर सरचिटणीस सोपान शहाणे, उपाध्यक्ष राजेंद्र पवार, सेक्रेटरी परशुराम कानकेकर, सहसचिव लॉरेन भंडारे, कमिटी मेंबर सुनील औसरकर, भुवनेश्वर पोई, खजिनदार ज्ञानेश्वर पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. वर्षभराच्या कामकाजाचा आढावा खजिनदार पाटील यांनी मांडला. सद्यस्थितीत व्यवस्थापनाबरोबर युनियनची वेतन वाढीच्या करारावर बोलणी सुरू आहे. विद्यमान युनियन पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ १७ जुलैला संपत आहे. पुढील बोलणीसाठी विद्यमान युनियनला मुदतवाढ देण्यात यावी, असा ठराव अध्यक्ष योगेश चव्हाण यांनी मांडला. या ठरावावर चर्चा करण्यात आली. हा चर्चेत माजी अध्यक्ष शिरीष भावसार, धवल चव्हाण, एन.डी. जाधव, अनिल गोजरे, राजू मोरे आदींसह काही सभासदांनी या मुदतवाढीला विरोध करण्याचा प्रयत्न केला. तर संजय सोनवणे, रवि संसारे, सुभाष मोरे, सुनील सारस्वत, विनायक भावसार, थोरात आदींसह असंख्य सभासदांनी ठरावाच्या बाजूने ठाम मत व्यक्त केले आणि ठरावाला पाठिंबा दिला. त्यामुळे ठराव बहुमताने संमत करण्यात आला. या सभेत सुमारे दोन हजार सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन परशुराम कानकेकर यांनी केले. सरचिटणीस सोपान शहाणे यांनी आभार मानले विद्यमान पदाधिकाऱ्यांची मुदत १७ जुलैला संपुष्टात येणार होती. परंतु आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वेतनवाढीच्या करारासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे वेतनवाढीचा करार पूर्ण होईपर्यंत विद्यमान पदाधिकारीच कामकाज करणार आहेत. वेतनवाढीचा करार चांगला झाला तर पुढील तीन वर्षांसाठी हेच विद्यमान पदाधिकारी कायम राहू शकतात, असेही कामगारांचे म्हणणे आहे.
महिंद्रा युनियनच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ
By admin | Updated: July 17, 2017 00:16 IST