नाशिक : पुणे विद्यापीठाच्या एन.बी.टी. लॉ कॉलेजमध्ये ‘डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ’ या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत आज विद्यार्थ्यांना भलत्याच विषयाची प्रश्नपत्रिका मिळाल्याने पुणे विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराचा पुन्हा एकदा अनुभव विद्यार्थ्यांना आला आहे. विद्यार्थी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात असतानाच विद्यापीठाने चूक सुधारल्याने सायंकाळी परीक्षा सुरळीत पार पडली. विद्यापीठाच्या ‘डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ’ या अभ्यासक्रमात आत ‘टॅक्सेशन’ या विषयाचा पेपर होता. विद्यार्थी दुपारी परीक्षेला बसले असता. त्यांच्या हातात मात्र ‘इन्कमटॅक्स’ विषयाचा पेपर पडला. भलत्याच विषयाची प्रश्नपत्रिका समोर आल्याने विद्यार्थ्यांचा चांगलाच गोंधळ उडाला. सदर बाब विद्यार्थ्यांनी केंद्रप्रमुख आणि काही विद्यार्थी संघटनांना कळविल्यानंतर महाविद्यालयाने तातडीने पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात संपर्क साधला. विद्यार्थी संघटनांनीही परीक्षा विभागात संपर्क केला. विद्यापीठाच्या चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी महाविद्यालयाला तातडीने ‘टॅक्सेशन’ विषयाची प्रश्नपत्रिका मेल केली. तसेच विद्यार्थ्यांना एक तासाचा वेळही वाढवून दिला. महाविद्यालयाने झेरॉक्सप्रत काढून विद्यार्थ्यांना देऊन सुधारित परीक्षा घेतली. (प्रतिनिधी)
परीक्षा ‘टॅक्सेशन’ची, पेपर ‘इन्कमटॅक्सचा’
By admin | Updated: November 3, 2015 21:33 IST