नशिक : सीमेवर शहीद जवान व पोलिसांप्रमाणे प्रत्येक भारतीयाने सर्वात आधी देशाचा विचार डोळ्यासमोर ठेवावा, तसेच प्रत्येक नागरिकाने फक्त आपले हक्क विचारात न घेता आपल्या जबाबदाऱ्यांचीही जाणीव बाळगावी, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी केले. देशात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी २४ तास कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलिसांची आठवण म्हणून केटीएचएम महाविद्यालयात पोलीस स्मृतिदिनानिमित्त शहीद पोलिसांना आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर नीलिमा पवार, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजू भुजबळ, प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर यांच्यासह शहीद पोलीस कॉन्स्टेबल फिरोजखान यांचे वडील अफजलखान पठाण व बंधू अमजदखान पठाण उपस्थित होते. पोलीस स्मृतिदिनानिमित्त मविप्रचे माजी विद्यार्थी उरी येथे शहीद झालेले संदीप ठोक व नाशिकरोड पोलिस ठाणे येथे कार्यरत असताना शहीद झालेले पोलीस कॉन्स्टेबल फिरोजखान अफजलखान पठाण यांच्यासह देशभरातील विविध ठिकाणी कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या जवानांना व पोलिसांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर यांनी, तर सूत्रसंचालन डॉ. डी. पी. पवार यांनी केले. यावेळी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सर्वांनी आधी देशाचा विचार करावा
By admin | Updated: October 24, 2016 00:46 IST