नाशिक / त्र्यंबकेश्वर : संदीप फाउंडेशनमधील विद्यार्थी रवींद्र बोरसे (वय २४, कार्तिकनगर, कामटवाडा, सिडको) या विद्यार्थ्याच्या खुनातील प्रमुख व फरार संशयित किरण जाधवला सोमवारी (दि़२७) त्र्यंबकेश्वर पोलिसांनी सोमेश्वर परिसरातून अटक केली़ घटनेच्या दिवसापासून फरार असलेला व पकडण्यात अपयशी ठरलेल्या पोलिसांच्या निक्रियपणाबद्दल नानासाहेब बोरसे यांनी मार्च महिन्याच्या अखेरीस ग्रामीण पोलीस अधीक्षक व त्र्यंबकेश्वरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले होते़ दरम्यान, जाधवला न्यायालयात हजर केले असता १ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़१६ फेबुवारी २०१५ रोजी त्र्यंबकेश्वररोडवरील संदीप फाउंडेशनमध्ये ट्रॅडिशनल डेचे सेलिब्रेशन सुरू होते़ सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास दोन गटांतील विद्यार्थ्यांनी शिवजयंतीनिमित्त मिरवणुका काढल्या़ त्यावेळी संशियत किरण जाधव (रा. आनंदवल्ली) आणि दिव्येश आवारे (रा. गंगापूर रोड) हे दोघे महाविद्यालय आवारात तलवार व धारदार शस्त्र घेऊन दहशत पसरवित होते़ या दोघांनीही वार केल्याने गंभीर जखमी झालेल्या बोरसेला उपचारासाठंी नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला़ या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़या खून प्रकरणी पोलिसांनी संशयित दिव्येश आवारे व आकाश निगळ या दोघांना अटक केली़ सध्या हे दोघेही न्यायालयीन कोठडीत असून, त्यांचा जामीन अर्जही न्यायालयाने नामंजूर केला आहे़; मात्र घटनेनंतर प्रमुख संशयित किरण नामदेव जाधव हा फरार झाला होता़ एका राजकीय पुढाऱ्याच्या आश्रयाने संशयित किरण जाधव हा राजरोसपणे शहरात फिरत असून, त्याचे नातलग धमकी देत असल्याचे निवेदन मयत रवींद्र बोरसेचे वडील नानासाहेब बोरसे यांनी ३१ मार्चला ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे दिले होती़ यानंतर सक्रिय झालेल्या पोलिसांनी सोमवारी जाधवला अटक केली़ (प्रतिनिधी)
संदीप फाउंडेशनमधील घटना : सुमारे अडीच महिन्यांनी कारवाई
By admin | Updated: April 27, 2015 23:41 IST