नाशिक : सरकारने मालवाहतूकदारांच्या मागण्या मान्य न केल्यास दिवाळीनंतर आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट असोसिएशनद्वारे सर्व राज्यांच्या संघटनांसोबत चर्चा करून बेमुदत संपाची हाक देईल. दोन दिवसांचा संप मंगळवारी (दि.१०) रात्री आठ वाजता जरी संपला असला तरी सरकारकडून अद्याप कुठलेही ठोस आश्वासन संघटनेला मिळाले नसल्याची माहिती नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून सांगण्यात आले.इंधनाचे वाढते दर, आरटीओमधील भ्रष्टाचार, टोलचा टोला अन् त्रुटी अशा अनेकविध समस्यांनी त्रस्त झालेल्या मालवाहतूकदारांनी पुकारलेल्या संपाच्या पहिल्या दिवशी सोमवारी नाशिक जिल्ह्यात सुमारे चार हजार ट्रकला ‘ब्रेक’ लागलेला होता. संपामधून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक वगळण्यात आली होती. त्यामुळे शहरातून केवळ एक हजार ट्रक रस्त्यावर धावत होत्या. सत्ताधारी भाजपा सरकारच्या माल वाहतुकीच्या चुकीच्या धोरणांच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आला होता. संप मंगळवारी रात्री आठ वाजेपर्यंत चालल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अंजू सिंगल यांनी दिली. शहरासह जिल्ह्यात दररोज विविध शहरांमधून ये-जा करणाºया एकूण पाच हजार ट्रक विविध ट्रान्सपोर्टमार्फत धावतात. त्यापैकी दूध, भाजीपाला, स्वयंपाकाचा गॅस यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू होती; मात्र औद्योगिक माल वाहतूक संपूर्णपणे बंद ठेवण्यात आल्याने औद्योगिक क्षेत्राला मोठा फटका बसला आहे.
...तर दिवाळीनंतर बेमुदत ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:21 IST