नाशिक : भाजपा व शिवसेनेत युतीबाबत बोलणी सुरू असली तरी प्रत्यक्षात राज्य व जिल्हा पातळीवर युतीची घोषणा झाली तरीही काही तालुक्यांत भाजपा व शिवसेना यांच्यातील पारंपरिक हाडवैर पाहता हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोरच लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नुकताच सिन्नर येथे शिवसेनेचा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळावा झाला. या मेळाव्यात ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी त्याबाबतचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मालेगाव व सिन्नर तालुक्यात कायमच शिवसेना व भाजपा यांच्यातच सरळसरळ लढत होते. दाभाडी विधानसभा मतदारसंघातून पारंपरिक प्रतिस्पर्धी दादा भुसे व प्रशांत हिरे यांच्यात तीन वेळा सरळसरळ लढत झाली आहे. तसाच काहीसा प्रकार सिन्नर विधानसभा मतदारसंघाबाबत घडत आहे. येथेही माजी आमदार माणिकराव कोकाटे विरुद्ध आमदार राजाभाऊ वाजे यांच्यात दोन पंचवार्षिकपासून सरळसरळ लढत होत आहे. हा अनुभव लक्षात घेऊनच दादा भुसे यांनी सिन्नरच्या मेळाव्यात युतीबाबत स्पष्ट भूमिका मांडली. दादा भुसे यांच्या म्हणण्यानुसार जशी सिन्नर व मालेगावला युती होणे शक्य नाही तसाच काहीसा प्रकार निफाड व नाशिक तालुक्यात आहे. या दोन्ही तालुक्यांतही बहुतांश गटात शिवसेना व भाजपातच सरळसरळ लढत होण्याची चिन्हे आहेत. नांदगाव तालुक्यातही फारशी वेगळी परिस्थिती राहील, असे दिसत नाही. (प्रतिनिधी)
युती झालीच तरी हाडवैर कायम
By admin | Updated: January 19, 2017 00:54 IST