सिन्नर : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी वडांगळी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला असून आरोग्य उपकेंद्र आणि जिल्हा परिषद शाळा यांच्या सहकार्यातून शाळेच्या इमारतीत प्राथमिक लक्षणे असलेल्या कोरोनाग्रस्तांची काळजी वाहण्यासाठी विलगीकरण कक्ष उभारण्यात आला आहे. दोन खासगी डॉक्टरांनी रुग्णांवर नियमित उपचार करण्यासाठी मोफत सेवा देण्याचे जाहीर केले. उपकेंद्रातून येथील रुग्णांना औषधे उपलब्ध करून दिली जाणार असून आशासेविकांची या विलगीकरण कक्षावर ड्युटी लावली आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक राऊत, आरोग्यसेवक अशोक सानप यांचीही या केंद्रावर निगराणी राहणार आहे. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी सरपंच योगेश घोटेकर यांनी जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांच्यासोबत चर्चा करून हा विलगीकरण कक्ष सुरू करण्यात पुढाकार घेतला.
सरपंच योगेश घोटेकर यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या अनुपस्थितीत सहकाऱ्यांनी रुग्णसेवेसाठी विलगीकरण कक्ष सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. येथे रुग्णांची चिकित्सा करून उपचार करण्यासाठी सकाळ व संध्याकाळ डॉ. सचिन निकम व डॉ. माणिक अडसरे हे गावातील खासगी डॉक्टर भेट देऊन रुग्णांची तपासणी करणार आहेत. रोज एका आशासेविकेची ड्युटी लावली असून त्यांच्यामार्फत दर दोन तासाला रुग्णांची ऑक्सिजन पातळी व शरीराचे तापमान घेतले जाईल. कुठल्याही रुग्णाच्या प्रकृतीत बिघाड वाटल्यास तत्काळ डॉक्टर उपलब्ध होतील.
---------------------
‘केवळ वडांगळी गावासाठीच नव्हे तर परिसरातील रुग्णांची गैरसोय होत असल्यास त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करून घेतले जाईल. रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेत कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी सहकार्य करावे.
- गायत्री खुळे उपसरपंच
-------------
सोयीसुविधांची उपलब्धता, योगा मार्गदर्शन
शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, स्वच्छ व खेळती हवा असलेल्या खोल्या, हिरवळ, उत्तम प्रकाश, पंख्याची व्यवस्था, आरामासाठी स्वच्छ गाद्या व अस्तरांची सोय केली आहे. डॉक्टरांकडून फुप्फुसाच्या क्षमतावाढीचे योगा मार्गदर्शन करण्यात येणार आहे. गावात आशासेविकांनी सर्वेक्षण हाती घेतले आहे. कोरोनाबाधित व गृह विलगीकरणात असलेल्या मात्र घरात स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था नसलेल्या रुग्णांना या मिनी कोविड सेंटरमध्ये दाखल केले जाणार आहे.
-------------
सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथे सुरु करण्यात आलेले विलगीकरण कक्ष. (२२ वडांगळी)
===Photopath===
220421\22nsk_26_22042021_13.jpg
===Caption===
२२ वडांगळी