मनमाड : येथील सेवानिवृत्त रेल्वे कर्मचार्याची फसवणूक करून अज्ञात चोरट्याने ४८ हजार रूपये किमतीची सोन्याची सोन्याची साखळी चोरून पलायन केले. येथील वसंत हौसींग सोसायटीत राहणारे परशराम शंकर मावरे(७०) हे पेन्शन घेण्यासाठी रेल्वेस्थानक परिसरात गेले होते. त्या ठिकाणी एका चाळीस वर्षे वयाच्या इसमाने ओळख काढून त्यांच्याशी गप्पा मारायला सुरूवात केली. मी तुमच्या मित्राचा मुलगा असून आई तुमच्या घरी पत्रिका देण्यास गेली असल्याचे सांगितले.
रेल्वे स्थानक परिसरातील एका हॉटेलात सरबत पिण्यासाठी त्यांना नेले. विवाह सोहळ्यासाठी सोन्याची साखळी तयार करायची असल्याचे सांगून तुमची साखळी दाखवा असे सांगितले. विश्वास संपादन केल्याने मावरे यांनी गळयातील साखली त्या इसमाच्या हातात दिली. भ्रमनध्वनी आला असल्याचा बहाना करून तो इसम साखळी हातातच घेऊन बाहेर गेला आणि त्याने धूम ठोकली. तो पळून गेल्यानंतर मावरे यांना आपण फसलो गेले असल्याचे लक्षात आले. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात मनमाड शहर पोलिसांत फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेलच्या सीसीटिव्हीच्या कॅमेर्यात त्या इसमाचे चित्रीकरण झाले असल्याने तमासास गती मिळणार असल्याचे समजते. (वार्ताहर)