नाशिक : पायाभूत सुविधा व बांधकामात भारतीय अभियंते कोठेही कमी नाहीत़ परंतु भारतीय अभियांत्रिकी जागतिक दर्जाची करण्यासाठी जागतिक आव्हान स्वीकारणारे शिक्षण अभियंत्यांना मिळणे आवश्यक असल्याचे मत नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ कन्स्ट्रक्शनचे महासंचालक डॉ़ मंगेश कोरगावकर यांनी येथे व्यक्त केले़ कालिदास कलामंदिर येथे अभियंता दिनानिमित्त द इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंगच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते़ डॉ़ कोरगावकर व कोकूयू कॅमलिनचे अध्यक्ष सुभाष दांडेकर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण झाले़ डॉ कोरगावकर म्हणाले, पायाभूत सुविधांसह सर्वच क्षेत्रात शासनाचे धोरण बदलत आहे़ गतिमान विकासासाठी सर्व क्षेत्रात परकीय गुंतवणूक वाढीस प्राधान्य दिले जात आहे़ यासह बांधकाम व स्थावर मालमत्ता क्षेत्रात आज मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असून, आगामी काळात मोठ्या प्रमाणात अभियंत्यांची गरज भासणार आहे़ यामुळे या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर संधी आहेत़ भारतीय अभियंते कोठेही कमी नसून, मागील पाच वर्षांत झालेल्या जागतिक दर्जाच्या बांधकामांवरून हे स्पष्ट होत आहे़ पुढील काळातील स्पर्धेतूनच गुणवत्ता समोर येत असून, यासाठी सर्वांनी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले़ अभियंता दिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक हेमांगी कुलकर्णी यांनी पटकावला़ द्वितीय क्रमांक सुयोग धूत, तर तृतीय क्रमांक कल्याणी शिरसाट यांनी मिळवला़ याप्रसंगी व्यासपीठावर द इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंंगच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष नरेंद्र बिरार, आयोजन समितीचे अध्यक्ष विजय कोठारी, मानद सचिव अपूर्वा जाखडी, आशिष कटारिया, विपुल मेहता आदि उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
जागतिक आव्हान स्वीकारणारे अभियांत्रिकी शिक्षण हवे
By admin | Updated: October 12, 2014 01:01 IST