नाशिकरोड : नाशिकरोड बसस्थानकाच्या आवारातील वाहतुकीला अडथळा ठरणारे मनपा गाळ्याचे व इतर अतिक्रमण जमीनदोस्त केल्यानंतर त्या ठिकाणी सीमेंट कॉँक्रिटीकरण करण्यात येत आहे. मात्र रेल्वेस्थानकातून बाहेर पडणाऱ्या रस्त्यावर हातगाडे, रिक्षा आदिंचे अतिक्रमण ‘जैसे थे’ असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकरोड बसस्थानकाच्या आवारातील वाहतुकीला अडथळा ठरणारे मनपाचे गाळे व इतर अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले. त्या जागेवर लागलीच सपाटीकरण करून सीमेंटचे कॉँक्रिटीकरण करण्यात आले आहे. कॉँक्रिटीकरण करण्यात आलेल्या ठिकाणी रेल्वेस्थानकातून बाहेर पडणाऱ्या रस्त्यावर कडेने बांबू-बल्ल्यांमधून बॅरिकेडिंग काढण्यात आले आहे. मात्र काही रिक्षाचालक प्रवासी भाडे शोधण्यासाठी बसस्थानकात रिक्षा घेऊन जातात. तर रेल्वेस्थानकातून बाहेर पडणाऱ्या रस्त्यावर हातगाड्यावरील विक्रेते आदि विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. तर काही चालक रॉँग साईडने रिक्षा घेऊन जात असतात. त्यामुळे रेल्वे, बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. पोलीस-मनपा प्रशासनाला या ठिकाणी जुमानतच नसल्याचे चित्र दिसत आहे. बसस्थानकातील सीमेंट कॉँक्रिटीकरणाचे काम दुसऱ्या पर्वणीच्या पूर्वी मार्गी लावून त्या ठिकाणी व्यवस्थित बॅरिकेडिंग करून नियोजन करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)
रेल्वेस्थानकाबाहेरील अतिक्रमण ‘जैसे थे’
By admin | Updated: September 3, 2015 23:31 IST